बेळगाव लाईव्ह : घरात कुणी नसलेले पाहून चोरट्यानी कुलूप तोडून घरात प्रवेश करत दोन घरे फोडल्याची घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस झाली आहे. बेळगाव शहरातील उज्वल नगर भागात ही घटना उघडकीस आली आहे.या घरफोडी मध्ये अंदाजे दहा ते बारा लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
उज्वलनगर परिसरातील दोन बंद घरे फोडून चोरट्यांनी तब्बल 12 लाखांचा मुद्देमाल पळून नेला शुक्रवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. माळ मारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या या घटनेची रात्री उशिरापर्यंत नोंद घेणे सुरू होते. दोन्ही घरफोड्यांमध्ये नऊ तोळ्यांचे सोन्याचे दागिने व एक लाख 85 हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार उज्वल नगर बारावा क्रॉस येथील क्षमा कॉलनीत मोमीन अफताब यरगट्टी व नवीन कुडची यांची घरे आजूबाजूला आहेत. दोन्ही घरातील कुटुंबीय घराला कुलूप लावून परगावी गेले होते. बंद घरे हेरून चोरट्यांनी मुख्य दरवाजा तोडत घरात प्रवेश केला. मोमीन यांच्या घरातून नऊ तोळे सोने व 25 हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे तर त्यांच्या बाजूलाच असलेले नईम कुडची यांचे घर फोडून यातील एक लाख साठ हजार रुपयांची रोकड पळवून नेल्याचे समजते. दोन्ही कुटुंबे शुक्रवारी दुपारी घरी आली असता त्यांच्या घराचे दरवाजे उघडे दिसले. त्यांनी आत जाऊन पाहिले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला ही माहिती त्यांनी माळमारुती पोलिसांना दिली.
माळ मारुती ठाण्याचे निरीक्षक जे एम कालीमिर्ची व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. रात्री साडेनऊ नंतर यापैकी मोमीन यांनी पोलीस ठाण्यात हजेरी लावून फिर्याद दिली. त्यानंतर याचा एफ आय आर दाखल करणे सुरू होते. त्यामुळे नेमका चोरीचा आकडा एफ आय आर नंतरच स्पष्ट होणार आहे.
नुकत्याच झालेल्या रमजान सणाच्या नंतर अनेक जण एकमेकांच्या नातेवाईकांना भेटायला जात असतात याचा फायदा उठवत चोरट्यानी घरात कुणी नसलेले पाहून प्रवेश करत ही दोन्ही घरे फोडली आहेत आणि घरातून मोठ्या प्रमाणात ऐवज लंपास केला असल्याचे बोलले जात आहे. या चोरीच्या घटनेने या परिसरात खळबळ माजली आहे. चोरीला घाबरून स्थानिक पंचमंडळीने प्रत्येक घरांना सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या सूचना केल्या आहेत.