बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर व परिसरात चोऱ्यांच्या घटना झपाट्याने वाढत असून, अवघ्या २४ तासांत तब्बल ९ चोऱ्यांची नोंद झाली आहे. त्यामध्ये मोठ्या रकमेचे दागिने व रोख रक्कम यासह दुचाकी वाहने चोरीला गेल्याच्या तक्रारींचा समावेश आहे. शहरातील शाहूनगर, टिळकवाडी, गणेशपूर, होन्निहाळ आदी परिसरात चोरट्यांनी घरफोडी यासह विविध ठिकाणी दुचाकी चोरी करत लाखोंचा ऐवज लंपास केल्याने पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
शहरात घडलेल्या ९ घटनांमध्ये सर्वाधिक मोठी घटना टिळकवाडी पोलीस स्थानकाच्या अखत्यारीत येणाऱ्या भागात घडली आहे. मुरिगेप्पा मरळी यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून १० लाख ८७ हजार रुपयांचे दागिने आणि रोकड लंपास केली आहे. तर कॅम्प पोलीस स्थानकाच्या अखत्यारीत येणाऱ्या गणेशपूर येथे शिवराम भट यांच्या घरातून ९ लाख ७८ हजार रुपयांचे दागिने व रोख रक्कम लंपास करण्यात आली.
होन्निहाळ भागातील भारती सोलबक्कनवर यांच्या घरी घरफोडी झाली असून, त्यामधून ६४ हजार २०० रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. याचप्रमाणे खडेबाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत, एकाच रात्री तीन चोऱ्यांचे प्रयत्न झाले असून यामध्ये सावदर गल्लीतील लक्ष्मण वाघमोडे यांच्या घरातून ५,००० रुपये रोख, मारुती गल्लीतील शंकर चव्हाण यांच्या घरातून १,००० रुपये रोख, आणि राणी चन्नम्मानगरातील दिनेश कांबळे यांच्या घरीही चोरट्यांनी घुसण्याचा प्रयत्न करत १,००० रुपयांची रोख रक्कम घेऊन पोबारा केला आहे.
घरफोडी, चोरी यासह दुचाकी चोरीच्या दोन घटना शहरात घडल्या आहेत. यापैकी एक दुचाकी शाहूनगर भागातून चोरीला गेली असून, याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दुसरी घटना रहदारी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, एक दुचाकी गायब झाली आहे.
या सर्व गुन्ह्यांची नोंद संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये करण्यात आली असून, पोलीस तपास सुरू आहे. चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तर दुसरीकडे पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.