बेळगाव लाईव्ह : आपल्या विशेष पुरवणीच्या माध्यमातून बेळगाव सह सीमाभागामध्ये मराठी साहित्य, संस्कृती, सण आणि इतर क्षेत्रामधील सर्व घडामोडी समाजासमोर उलगडणार्या अरुणा गोजे पाटील यांचा सहाव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात सत्कार करण्यात आला.
‘साहित्य दरबार’ या सहाव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनानिमित्त निघालेल्या विशेष पुरवणीचं कौतुक साहित्य संमेलनात करण्यात आले. त्याचबरोबर सीमा भागात विशेष पुरवण्या काढून नवीन साहित्यिक वाट चोखाळणाऱ्या आणि या माध्यमातून इतिहास घडवणाऱ्या महिला संपादिका अरुणा गोजे पाटील यांचं विशेष कौतुक मराठा मंदिर येथे रंगलेल्या सहाव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात करण्यात आला.
समाजाला वेगवेगळ्या पुरवण्यांच्या माध्यमातून विशेष माहिती पुरवणाऱ्या अरुणा गोजे पाटील यांनी तारांगण च्या माध्यमातून बेळगाव शहरातील महिलांचा संघटन करत अनेक सामाजिक कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडले. आणि त्याचबरोबर प्रसंगानुसार विशेष पुरवण्या काढल्या आणि वाहवा मिळवली.
सीमाभागातील काळ्यादिनी एक नोव्हेंबर रोजी विशेष पुरवणी काढली होती ती लक्षवेधी ठरली होती. त्यानंतर अनेक साहित्य संमेलनाच्या, बेळगाव शहर परिसरात खानापूर तालुक्यात होणाऱ्या जत्रा यात्रांच्या पुरवण्या, आरोग्य विषयी पुरवण्या, सणवारांच्या पुरवण्या अशा विशेष पुरवण्या काढत वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी आपला जाणिवेचा ठसा उमटवला आहे. त्याचबरोबर सीमा भागातील अनेक कवी कवयित्रींना या पुरवण्यांच्या माध्यमातून व्यासपीठ देण्याचे काम देखील त्यांनी पार पाडले आहे. चांदा ते बांदा अनेक लेखकांचे लेख त्यांनी आपल्या आपल्या संदेश न्यूज या विशेष अंकात प्रसिद्ध केले. त्याचबरोबर पुरवणीत लिहिणाऱ्या प्रत्येक लेखकाला मानधन देत त्यांनी विशेष पायंडा पाडला. मूळच्या कोल्हापूर माहेर असणाऱ्या गोजे पाटील या बेळगावच्या सासुरवाशीन आहेत. त्यांचे कोल्हापूरच्या प्रसिद्ध विद्यापीठ हायस्कूल या शैक्षणिक संस्थेत प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पार पडले त्याचबरोबर त्यांचे उच्च शिक्षण देखील कोल्हापुरातच झाले आहे. त्यांच्या जडणघडणीत कोल्हापूरचा सिंहाचा वाटा आहे. बेळगाव ने मला साहित्यिक, सांस्कृतिक आणि सामाजिक ओळख दिली असे त्यात जाणीवपूर्वक व्यक्त करतात. त्यांचा स्वभाव धाडसी ,संयमी आणि अचूक निर्णय घेणारा असा आहे.
सहाव्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने काढण्यात आलेली साहित्य दरबार ही विशेष पुरवणी संदेश न्यूजची एक लक्षणीय पुरवणी ठरली. साहित्यसंमेलनाला उपस्थित साहित्यिकांनी सदर पुरवणीचे संमेलनातच कौतुक केले.