बेळगाव लाईव्ह :स्मार्ट सिटी -2 योजनेतील नियोजित कामांच्या जागेची पाहणी, तसेच सध्या सुरू असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या तांत्रिक बाबी आणि अंमलबजावणी प्रक्रियेचे मूल्यांकन करण्यासाठी फ्रान्समधील उच्चस्तरीय तज्ज्ञांचे पथक आणि बेळगाव शहरातील वरिष्ठ अधिकारी यांच्यात आज गुरुवारी चर्चा झाली.
बेळगाव स्मार्ट सिटी कार्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये झालेल्या या बैठकीस महापौर मंगेश पवार उपमहापौर वाणी जोशी महापालिका आयुक्त शुभा बी. आणि स्मार्ट सिटी व्यवस्थापकीय संचालिका आफ्रिदा बानू उपस्थित होते.
बैठकीमध्ये बोलताना मनपा आयुक्त शुभा बी. यांनी स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत सध्या सुरू असलेल्या महत्त्वाच्या प्रकल्पाबबद्दल तपशीलवार माहिती दिली. ज्यामध्ये रस्ता रुंदीकरण, ड्रेनेज अर्थात भुयारी गटार सुधारणा स्मार्ट सिग्नल प्रणाली पिण्याच्या पाणी पुरवठा प्रकल्पाची अंमलबजावणी आदींचा समावेश होता.
बैठकीत बोलताना महापौर मंगेश पवार यांनी स्मार्ट सिटी प्रकल्प बेळगाव शहराच्या सर्वांगीण विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे सांगितले. तसेच कचरा व्यवस्थापनाचे काम आणि नियोजित विकास कामांबद्दल मत व्यक्त केले. उपमहापौर वाणी जोशी यांनी देखील आपले मत व्यक्त करताना नागरिक-केंद्रित नियोजनाचे महत्त्व अधोरेखित केले.
फ्रान्समधील तज्ज्ञांच्या पथकाचे प्रमुख ल्यूक लेव्हलँक यांनी सांगितले की, “बेळगावच्या भौगोलिक परिस्थितीनुसार पर्यावरणपूरक आणि दीर्घकालीन शाश्वत प्रकल्प राबविण्यासाठी आम्ही शिफारसी देत आहोत. नियोजित एकात्मिकतेमुळे प्रभावी शहरी विकास होऊ शकतो.
” बैठकीनंतर फ्रेंच तज्ज्ञांच्या पथकाने तुरमुरे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, महापालिकेच्या सदाशिवनगर येथील गॅरेज आणि एका कचरा संकलन केंद्रासह बेळगाव स्मार्ट सिटीज -2 योजनेतील नियोजित कामांच्या जागांना भेट देऊन पाहणी केली. या तज्ज्ञांच्या पथकामध्ये फ्रेंच डेव्हलपमेंट एजन्सी तसेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेयर्स या संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. दुपारच्या जेवणानंतर सदर पथकाने खासबाग येथील कचरा वर्गीकरण केंद्र, जुने बेळगाव येथील परमनंट नाईट शेल्टर मधील बायोगॅस प्रकल्प वगैरे ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली.
अखेर विश्वेश्वरय्यानगर येथील कमांड अँड कंट्रोल सेंटरला भेट देऊन तेथील कामकाजाची माहिती घेतल्यानंतर फ्रेंच पथकाच्या आजच्या पाहणी दौऱ्याची सांगता झाली. याप्रसंगी त्यांच्या समवेत मनपा आयुक्त आणि बेळगाव स्मार्ट सिटी व्यवस्थापकीय संचालक, सर्व अभियंते आणि कर्मचारी उपस्थित होते.