बेळगाव लाईव्ह :सिग्नल सुटल्यामुळे तो ओलांडण्याच्या घाईत एक मोटर सायकल स्वार जोडपे थेट टँकर खाली जाऊन देखील दैव बलवत्तर म्हणून आसपासच्या लोकांमुळे बचावल्याची थरारक घटना आज सोमवारी सकाळी राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे घडली.
सिग्नल सुटला की सर्वांनाच तो ओलांडण्याची एकच घाई झाल्याचे चित्र सध्या शहरातील प्रत्येक सिग्नलच्या ठिकाणी पहावयास मिळते. मात्र असे करताना आपला किंवा शेजारील इतर वाहन चालकाचा जीव धोक्यात येऊ शकतो याचे कोणालाच भान नसते, जो तो समोरील वाहन चालकाला मागे टाकून सिग्नल ओलांडण्याच्या घाईत असतो.
हीच परिस्थिती आज सकाळी कोल्हापूर सर्कलकडून शहराकडे येणाऱ्या रस्त्यावर चन्नम्मा सर्कल येथे होती. मात्र यावेळी पुढे जाण्याच्या घाईत असलेले एक मोटरसायकलस्वार जोडपे तोल जाऊन खाली कोसळले ते थेट शेजारील टँकरच्या खाली जाऊन पडले.

त्यावेळी गर्दी असल्यामुळे टँकर चालक अंदाज घेऊन टँकर पुढे नेण्याच्या तयारीत होता. त्याला मागील चाकाच्या ठिकाणी काय घडले याची कल्पना नव्हती. या अल्पकाळात आजूबाजूच्या लोकांनी टँकर खाली पडलेल्या त्या जोडप्याला हात धरून बाहेर खेचून काढले.
तेवढ्यात टँकरचे मागील चाक टँकरचे मागील चाक त्या मोटरसायकलवर चढल्यामुळे चालकाने टँकर तात्काळ थांबवला. या पद्धतीने दैव बलवत्तर म्हणून संबंधित जोडप्याचा जीव वाचला. सदर अपघातामुळे घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. अति घाई आणि संकटात नाही या म्हणीनुसार घाईच संकटात नेत असते यासाठी वाहन चालकांनी सिग्नल सुटतो त्यावेळी संयमाना सावकाश गाडी पुढे हाकणे गरजेचे बनले आहे.