बेळगाव लाईव्ह : बेळगावात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. तीन वर्षांपासून प्रेमसंबंधात असलेला तरुण पीडितेला मद्यप्राशन करून तिच्यावर अत्याचार करून पसार झाला आहे. सध्या मुख्य आरोपी फरार असून, पोलिसांनी त्याचा साथीदार अटक केला आहे.
ही घटना बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. औंरंगजेब नावाच्या २३ वर्षीय तरुणाचे एका १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीसोबत गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते.
मात्र, काही दिवसांपूर्वी त्याने आपला एक मित्र सोबत घेऊन पीडित मुलीच्या घरी जाऊन तिला जबरदस्तीने मद्यप्राशन करवले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करून औंरंगजेब तिथून फरार झाला.
गंभीर बाब म्हणजे, या आधीही तो वारंवार मुलीच्या घरी चाकू व इतर शस्त्र घेऊन जाऊन तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होता. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीचा मित्र, ज्याने त्याला मदत केली याला अटक केली आहे, तर औंरंगजेब अद्याप फरार आहे.
या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात पॉक्सो कायदा आणि इतर गंभीर कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे.