बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील हलगा गावाने यंदा डॉल्बीमुक्त उत्सव, सण – समारंभ साजरे करण्याचा एक स्तुत्य निर्णय घेतला होता. यांसुआर आज हलगा येथे पार पडलेली श्री कलमेश्वर यात्रा डॉल्बीमुक्त यात्रा साजरी करण्यात आली.
बेळगाव तालुक्यातील हलगा गावात यंदा कलमेश्वर यात्रेपासून एक नवा आदर्श घालून दिला गेला. ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने आणि ग्रामस्थांच्या एकमुखी निर्णयाने या यात्रेत डॉल्बीचे वापर पूर्णतः टाळण्यात आले. डॉल्बीमुळे होणारे अनेक त्रास लक्षात घेता हा निर्णय अत्यंत योग्य आणि समाजहिताचा ठरतो.
मोठ्या आवाजामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, विद्यार्थ्यांचे होणारे हाल, पशुपक्ष्यांवर होणारे दुष्परिणाम, तसेच ध्वनिप्रदूषणाचा वाढता धोका यामुळे डॉल्बीमुक्त सणांची गरज भासत होती. याशिवाय, अशा डॉल्बीमधून निर्माण होणाऱ्या वाद, गैरसोयी आणि कधी कधी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होत होते.
या पार्श्वभूमीवर, हलगा ग्रामपंचायतीने गावातील कोणत्याही सण-उत्सवात डॉल्बी वापरायचा नाही, असा निर्णय घेतला आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी आजच्या कलमेश्वर यात्रेद्वारे झाली. आज पार पडलेल्या यात्रेमध्ये ढोल, ताशा, सनई, चौघडे अशा पारंपरिक वाद्यांचा गजर गल्लोगल्ली, चौकाचौकात ऐकू आला.
समाजासाठी हितकारक आणि पर्यावरणपूरक सण-संस्कृती जपण्याच्या दिशेने हे टाकलेले पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे. असे निर्णय स्वागतार्ह असून इतर गावांनीही याचा अनुकरण करणे गरजेचे आहे. मागील वर्षी कंग्राळी खुर्द या गावानेही मसणाई यात्रेच्या निमित्ताने डॉल्बीमुक्त सण साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार कंग्राळी खुर्द गावाने वार्षिक यात्रा डॉल्बीमुक्त साजरी केली. आता एप्रिल आणि मे महिन्यात बेळगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये यात्रा भरविण्यात येणार आहे, अशावेळी या गावांनाही हलगा, कंग्राळी या गावांचा आदर्श घेऊन डॉल्बीमुक्त यात्रा साजरी करण्याचा संकल्प करणे हिताचे ठरेल.
कोणत्याही उत्सवात डॉल्बी किंवा अत्याधुनिक यंत्रणांचा वापर न करता, आपली परंपरा जपता येते आणि ध्वनिप्रदूषणाचे परिणामही टाळता येतात. संपूर्ण बहुजन समाजाने अशा सकारात्मक बदलाच्या दिशेने पाऊल टाकणे आज आवश्यक झाले आहे. चुकीच्या प्रथा, चालीरीती आणि परंपरा यामुळे बहुजन समाज मागे पडत आहे. बदलाचा स्वीकार आणि नवीन विचार स्वीकारणे, हे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे.
आपली संस्कृती आणि परंपरा टिकवून ठेवण्यासाठी अशा परिवर्तनात्मक निर्णयांची आवश्यकता आहे. आजच्या काळात, योग्य संस्कृती आणि परंपरांचा प्रचार आणि प्रसार महत्त्वाचा आहे. डॉल्बीमुक्त अशी यात्रा साजरी करण्याचा निर्णय फक्त एक सण किंवा उत्सव नाही, तर तो समाजाच्या सकारात्मक बदलाची सुरुवात आहे. समाजाने नवा दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे आणि केवळ परंपरा आणि संस्कृतीचे पालन करत नाही, तर त्यात नवीन विचारांचा समावेश केला पाहिजे. समाजाच्या विकासाच्या दृष्टीने असे निर्णय स्वागतार्ह असून, इतर गावांनीही याचे अनुकरण करून समाजाला परिवर्तनाच्या दिशेने घेऊन जाणे हि काळाची खरी गरज आहे.