बेळगाव लाईव्ह विशेष : लग्नाचं वय येताच प्रत्येक घरात एक अघोषित तणाव सुरू होतो. वधूपित्यांची काळजी वेगळी, वरपित्याचं टेन्शन वेगळं. पण या सगळ्या ‘जुळवाजुळवी’मध्ये सगळ्यात जास्त पिचतो तो एक तरुण! जो लग्नाच्या विचारात अडकतो आणि अनेकदा नकार, अपयश, अपेक्षा आणि जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली गुदमरतो.
अलीकडे लग्न जमत नाही म्हणून आत्महत्या करणाऱ्या तरुणांच्या बातम्या डोकं सुन्न करणाऱ्या आहेत. काही दिवसांपूर्वीच बेळगावमधील एका तरुणाने लग्न ठरत नाही या कारणास्तव विष प्राशन करून जीवन संपवलं. ही केवळ एक घटना नाही, तर समाजात खोलवर रुजलेली एक वेदना आहे, जी उघडपणे कोणी बोलत नाही, पण हळूहळू अनेक तरुणांच्या मनात रुतत जात आहे. मध्यमवर्गीय कुकुटुंबातील मुलं असोत किंवा खेड्यांतील तरुण, आज विवाह ठरणं म्हणजे एक धाडसाचं काम झालं आहे. एकीकडे मुलांकडून शाश्वत नोकरी, चांगलं घर, चारचाकी गाडी, उज्वल भविष्य अशा अपेक्षा असतात; तर दुसरीकडे मुलांच्या कुटुंबीयांकडून मुलीच्या सौंदर्यापासून तिच्या स्वभावपर्यंत सगळं ‘परफेक्ट’ असावं अशी भावना असते. यात कुठे तरी ‘मानसिक स्वास्थ्य’ हरवतंय हे लक्षात येत आहे.
लग्न जमत नाही, म्हणून तरुण आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतो यामागे केवळ नकाराचे कारण नसून तर एक सामाजिक गोंधळ आहे. घरच्यांचा दबाव, सततचे स्थळ बघणं, न पटणाऱ्या अपेक्षा, मित्रमंडळींचे लग्न लागणं आणि आपण मागे राहतोय ही भावना हे सगळं मनावर खोल ठसे उमटवतं. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे समुपदेशनाचा अभाव. आजही लग्न ठरत नाही म्हटल्यावर मानसिक आरोग्य तज्ज्ञांकडे जाणं ही ‘लाज’ समजली जाते. पण खऱ्या अर्थाने, हा ताण सांभाळण्यासाठी समुपदेशन ही काळाची गरज आहे. पालकांचं भान आणि संवाद यातूनही बरेच प्रश्न सुटू शकतात.
एकेकाळी विवाहसंस्था म्हणजे समजूत, समर्पण आणि सोबत यांचं प्रतीक होती. पण आज ती सौंदर्य, पैसा, स्थैर्य, गाडी, बंगला आणि ‘स्टेटस’च्या गोष्टींनी भरलेली आहे. त्यातून जेव्हा एक तरुण या स्पर्धेत पिछाडीवर पडतो, तेव्हा त्याला आयुष्यच नकोसं होतं. विवाह जमत नाही म्हणून कोणाचं जीवन संपवावं लागेल, ही कल्पनाच अस्वस्थ करणारी आहे.
दशकानुदशकं स्त्रीभ्रूणहत्या झाल्याने अनेक भागांत स्त्रियांपेक्षा पुरुषांची संख्या लक्षणीय वाढली आहे. परिणामी, अनेक मुलांच्या वाट्याला लग्नासाठी वधू मिळणं कठीण झाल आहे. बहुतांश ग्रामीण व निमशहरी भागात मुलं शिक्षणात मागं पडतात. त्यांचं शिक्षण थांबतं, नोकरी नाही, उत्पन्न नाही, तर मुली शिक्षणात पुढे जातात. उच्चशिक्षित मुलींना अशिक्षित वा अल्पशिक्षित मुलं नको वाटतात. त्यामुळे शिक्षणातील विषमता हा विवाहाअडथळ्याचा एक मोठा भाग बनला आहे.
इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअॅप स्टेटसवर ‘हॅपी कपल्स’, ‘डेस्टिनेशन वेडिंग्स’ पाहून अनेक तरुण मानसिकदृष्ट्या कोलमडतात. आपल्या आयुष्यात काहीच घडत नाही, आपण मागे पडलो आहोत ही भावना त्यांना अधिक नैराश्याकडे घेऊन जाते. लग्न न ठरणं हे अनेक तरुणांना नैराश्याकडे ढकलतं. अशा वेळी व्यसनांकडे ओढली जाणारी पावलं दिसून येतात. यातून त्यांच्या आरोग्याचा ऱ्हास होतो, नोकरी-व्यवसाय ढासळतो आणि संपूर्ण कुटुंब आर्थिक, मानसिक अडचणीत सापडतं.
या सगळ्याची सुरुवात एकटेपणातून होते. सध्या ज्याप्रमाणे परीक्षा किंवा प्रेमभंगातून आत्महत्या होतात, त्याचप्रमाणे ‘लग्न ठरत नाही’ म्हणून आत्महत्या करणाऱ्यांची संख्याही वाढते आहे. ही गोष्ट केवळ वैयक्तिक समस्या नसून, एक सामाजिक आरोग्याचा प्रश्न आहे. बेळगावसह इतर शहरांतून अशा घटना कधी छोट्या बातम्यांच्या ओळीत दिसतात, पण त्यामागची भयावहता कोणालाही हादरवून टाकेल. नोकरी, उत्पन्न आणि आर्थिक स्थैर्य याबाबत मुलांकडून मोठ्या अपेक्षा असतात. पण ग्रामीण आणि निमशहरी भागांतील मुलांना त्या अपेक्षा पूर्ण करणं कठीण जातं. त्यात कोरोनानंतर आलेली बेरोजगारी, महागाई आणि अस्थिरता यामुळे ही अडचण अजूनच वाढली आहे.
या सगळ्यांतून मार्ग काढायचा असेल, तर पालकांनी मुलांशी संवाद साधावा. त्यांच्या मनात काय चाललंय हे जाणून घ्यावं. समाजाने विवाहाबद्दलची अपेक्षा आणि निकष पुन्हा विचारात घ्यावेत. तरुणांनी स्वतःकडे सकारात्मक दृष्टीने पाहणं, आत्मनिर्भरता आणि जीवनाच्या विविध पैलूंची जाणीव ठेवणं आवश्यक आहे. विवाह ही आयुष्याची गरज असली, तरी ती अस्तित्व सिद्ध करणारी अट नाही.
लग्न ठरत नाही म्हणून आयुष्य संपवण्याची वेळ का यावी? या परिस्थितीकडे समाजाने, पालकांनी आणि स्वयं तरुणांनीही स्वतःकडे खोलवर पाहण्याची वेळ येऊन ठेपली आहे. आत्ममूल्य जपायचं असेल, तर लग्नाच्या चौकटीत नव्हे, तर माणूस म्हणून उभं राहण्यात खरी प्रतिष्ठा आहे हे जाणणं आवश्यक आहे.