बेळगाव लाईव्ह :भारतरत्न डॉ. बी.आर. अर्थात बाबासाहेब आंबेडकर यांनी बेळगाव जिल्ह्याला अनेक वेळा भेट दिली असून त्याच्या इतिहासावर एक खोलवर छाप सोडली आहे.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बेळगाव भेटीचा थोडक्यात तपशील पुढील प्रमाणे आहे. त्यांनी 11 -12 एप्रिल 1925 रोजी निप्पाणीला भेट दिली आणि 12 एप्रिल रोजी बहिष्कृत हितकारिनी सभेच्या जाहीर सभेला संबोधित केले.
जून 1925 च्या छायाचित्रात डॉ. आंबेडकर निप्पाणी येथील एका अतिथीगृहात दलित वर्गाच्या हक्कांवर केंद्रित परिषदेत सहभागी झाले होते. त्यानंतर 1932 मध्ये त्यांनी निप्पाणीला दुसरी भेट दिली.
पुढे 1937 मध्ये त्यांनी चिक्कोडीला भेट दिली. बेळगाव येथे 1940 मध्ये बेळगाव शिक्षक संघटनेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सत्कार केला. डॉ. आंबेडकर स्थानिक बार असोसिएशनला संबोधित करण्यासाठी 26 डिसेंबर 1939 रोजी बेळगावला आले. त्यावेळी कंग्राळ गल्लीतील बस्तवाडकर कुटुंबाचे पाहुणे म्हणून ते राहिले होते.
आज अनेकजण या निवासस्थानाचे संग्रहालय म्हणून जतन करण्याची मागणी करत आहेत.
बेळगावचे स्थानिक कार्यक्रम : 1939 च्या या भेटीदरम्यान तत्कालीन नगरपालिकेतर्फे डॉ. आंबेडकर यांना प्रथम नागरिक भीमराव पोतदार यांनी कांस्य स्मृतिचिन्ह प्रदान करून सन्मानित केले होते. या नागरी सत्कार समारंभाचा एकूण खर्च अवघा 51 रुपये इतका आला होता.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पिढ्यांपिढ्या प्रेरणा देणाऱ्या या ऐतिहासिक भेटींचे स्मरण करून आज त्या साजरा केल्या जात आहेत.