बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील कुद्रेमनी गावात एका पिसाळलेल्या कुत्र्याने मंदिरात घुसून अचानक हल्ला केल्याने गावात भीतीचं वातावरण पसरलं आहे. या हल्ल्यात आठ ग्रामस्थ जखमी झाले असून सर्व जण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, सोमवारी सायंकाळच्या सुमारास कुद्रेमनी गावातील विठ्ठल मंदिरात सुरू असलेल्या पूजेदरम्यान अचानक एका पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला. रस्त्यावरून थेट मंदिरात घुसून कुत्र्याने मंदिरातील भाविकांवर हल्ला चढवला.
या हल्ल्यात मल्लप्पा पाटील, मल्लप्रभा पाटील, नीलकंठ साखरे, विठ्ठल मांडेकर यांच्यासह अन्य काही ग्रामस्थ जखमी झाले. या हल्ल्यातील जखमींपैकी काहींना खोल जखमा झाल्यामुळे तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल आले असून उपचार सुरु करण्यात आले आहेत. घटनेनंतर ग्रामस्थांनी संतापाच्या भरात कुत्र्याला ठार केलं. मात्र या घटनेनंतर परिसरात भीतीचं आणि अस्वस्थतेचं वातावरण आहे.
बेळगाव जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. कुद्रेमनी गावात घडलेल्या ताज्या घटनेत आठ ग्रामस्थ जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत साऱ्यांनाच आता कुत्र्यांची धास्ती वाटत आहे.
कुद्रेमनी येथील ही केवळ एक घटना नसून बेळगाव जिल्ह्यात सध्या अशा प्रकारांच्या घटना सातत्याने घडत आहेत. गावोगावात पिसाळलेल्या कुत्र्यांचे झुंडीच्या झुंडी फिरताना दिसत असून लहान मुलं, शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांना घराबाहेर पडायलाही भीती वाटते आहे.
गेल्या काही दिवसांतच शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी कुत्र्यांच्या हल्ल्याची प्रकरणं समोर आली आहेत. स्थानिक प्रशासन आणि पालिकेने या भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीने ठोस पावलं उचलण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
यामागची कारणे पडताळून पाहिली तर बेळगाव शहर, परिसर आणि ग्रामीण भागातील कचरा व्यवस्थापनाचे प्रमुख कारण समोर येत आहे. कचरा व्यवस्थापनात सर्वच स्तरावरील प्रशासन कुचकामी ठरत असून शहर, परिसर, ग्रामीण भाग, एक्स्टेंशन भाग, रस्त्याच्या दुतर्फ़ा, कोपरे, झाडी, कुंपण, निर्जन स्थळी अशा अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीगच्या ढीग साचत असल्याचे दिसून येत आहे. या कचऱ्यात सर्रास भटकी कुत्री असल्याचे प्रकर्षाने दिसून येते. हॉटेल, चिकन, मटण यासह मांसाहाराच्या दुकानातील टाकाऊ पदार्थ अशा अनेक गोष्टी कचऱ्यात आढळून येत आहेत. परिणामी कचऱ्यातील मांस खाऊन सवकलेली कुत्री हिंसक पद्धतीने वागत आहेत. याचेच परिणाम नागरिकांवर वाढत चाललेल्या कुत्र्यांच्या हल्ल्यातून दिसून येत आहेत.
दुसऱ्या बाजूला मध्यंतरी प्रशासनाने कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची मोहीम हाती घेतली होती. मात्र ‘पहिले पाढे पंचावन्न’ अशा पद्धतीने पुन्हा हि मोहीम ठप्प झाल्याने भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. शहर परिसरातील वाढत्या घटनांचा आढावा घेतल्यास प्रशासनाने तातडीने यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.