बेळगाव लाईव्ह :बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, बेळगाव महापालिका आणि समाज कल्याण खात्याच्या संयुक्त विद्यमाने आज सोमवारी 14 एप्रिल रोजी सकाळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती समारंभपूर्वक मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने प्रशासनातर्फे आज शहरातील राणी कित्तूर त्यांना सर्कल जवळील डाॅ. आंबेडकर उद्यानात विशेष सजावट करण्यात आली होती.
जयंतीनिमित्त सकाळी 10 वाजता उद्यानातील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित दलित बांधव आणि नागरिकांकडून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयजयकार करण्यात येत होता. कार्यक्रमास महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासह जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, प्रादेशिक आयुक्त संजय शेट्टणवर, पोलीस महानिरीक्षक चेतनसिंग राठोड, शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
या मान्यवरांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार आणि पुष्पदल अर्पण करून अभिवादन केले. आता दुपारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी विचारवंत बी. संतोष यांचा व्याख्यानाचा कार्यक्रम झाल्यानंतर सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, कॅम्प येथून चित्ररथ मिरवणूक काढली जाणार आहे.