बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरपालिकेच्या मुख्य सभागृहात 5 एप्रिल रोजी सकाळी 11 वा. नूतन महापौर मंगेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. नूतन महापौरांच्या अध्यक्षतेखाली ही पहिलीच सर्वसाधारण सभा होणार आहे. या सभेत तब्बल 12 विषयांवर चर्चा होणार आहे.
या सभेत या सभेत 5 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून त्यास मंजुरी देण्यात येईल. तसेच, अर्थ स्थायी समिती, आरोग्य स्थायी समिती, कर स्थायी समिती आणि बांधकाम स्थायी समित्यांच्या बैठकीतील निर्णयांचे वाचन केले जाणार आहे.
अर्थ स्थायी समितीच्या शिफारसीनुसार 4 टक्के घरपट्टी वाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. सर्वसाधारण बैठकीत या प्रस्तावावर चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. हा निर्णय झाल्यास शहरातील मिळकतदारांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून घरपट्टी वाढीबाबत चर्चा सुरू आहे, मात्र यावेळी 4 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.
महानगरपालिकेचा अर्थसंकल्प 80 कोटी रुपयांचा असून, विविध विकासकामांसाठी निधीची कमतरता भासत आहे. शहराच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी एलअँडटी कंपनीकडे सोपविण्यात आली आहे, मात्र 24 तास पाणीपुरवठा योजना राबवण्यासाठी त्यांना मोठा निधी देणे बाकी आहे.
त्यामुळे उत्पन्नवाढीच्या दृष्टीने विविध मार्ग शोधले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर, महापालिका आयुक्तांनी सध्याची घरपट्टी जुन्या दरानुसार असल्याने ती वाढविणे आवश्यक असल्याचे सांगितले होते.
याचप्रमाणे जाहिरात फलक शुल्क वसूल करणे, ई-आस्थिमध्ये मालकाचे नाव नमूद करणे, महात्मा फुले रोडवरील गटाराची स्वच्छता करणे, ऑटोनगरमधील बेकायदा रस्त्यांबाबत चर्चा करणे, कंत्राटी पद्धतीने कायदा सल्लागाराची नियुक्ती करणे, गोवावेस रेल्वे उड्डाण पुलावर बसवेश्वर यांच्या नावाचा फलक लावणे, छत्रपती शिवाजी महाराज कपिलेश्वर उड्डाण पुलावर फलक उभारणे, पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडे हटविणे, पथदीपांची देखभाल आणि बसथांब्यांवरील जाहिरातींवर कर वसूल करणे यावरील चर्चेसह प्रभाग क्र. 51 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना करण्याचा प्रस्ताव आरोग्य स्थायी समितीने मंजूर केला असून, तो सभेत मांडण्यात येईल. तसेच बुडाकडे असलेल्या रामतीर्थनगरचे महानगरपालिकेकडे हस्तांतरण करण्यास मंजुरी देण्याचा मुद्दा सभेत मांडला जाणार आहे. तसेच, अध्यक्षांच्या परवानगीने इतर विषयांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे.