बेळगाव लाईव्ह : ओबीसी प्रवर्गातील काही जणांनी अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळवून सरकारी नोकऱ्या आणि बढती घेतल्याचा आरोप वाल्मिकी नायक समाजाने केला आहे. या पार्श्वभूमीवर समाजाच्या वतीने आंदोलन छेडत दोषींवर कारवाईची मागणी केली.
वाल्मिकी नायक समाजाच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना सदर मागणीसंदर्भात निवेदन देण्यात आले. समाजाच्या सदस्यांनी मुख्यमंत्र्यांनी यात हस्तक्षेप करून हा प्रकार थांबवण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे.
कर्नाटकमध्ये सुमारे 60 ते 70 लाख वाल्मिकी नायक समाजाचे लोक आहेत. यामध्ये बेड, बेडर, वाल्मिकी, नाईक आणि नायक यांना अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र दिले जाते. मात्र, तालीवार आणि परिवार या जातींचा अनुसूचित जातीच्या यादीत समावेश राहिला नव्हता. दीर्घकाळाच्या संघर्षानंतर या जातींचा अनुसूचित यादीत समावेश करण्यात आला आणि शिक्षण व नोकऱ्यांमधील आरक्षण 3 टक्क्यांवरून 7 टक्के करण्यात आले.
मात्र, कोळी समाजातील काही तालीवार समाजाच्या व्यक्तींनी याचा गैरफायदा घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. कल्याण आणि मुंबई कर्नाटक भागात सुमारे 2 लाख गंगामठ समुदायातील लोक अनुसूचित जातीच्या तालीवार समाजाचे प्रमाणपत्र मिळवत असल्याचे निदर्शनास आले आहे.
बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे सरकारी नोकऱ्या व बढती मिळविणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी बेळगाव वाल्मिकी नायक समाजाचे अध्यक्ष राजशेखर तालीवार यांनी केली आहे. या आंदोलनात समाजाचे मोठ्या संख्येने बांधव सहभागी झाले होते.