बेळगाव लाईव्ह :पिसाळलेल्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात दोन बालिका गंभीर जखमी झाल्याची घटना खानापूर तालुक्यातील बिडी गावामध्ये काल गुरुवारी सकाळी घडली.
या हल्ल्यात त्या कुत्र्याने एका बालिकेच्या कानाचा लचकाच तोडला आहे.
आराध्या रमेश काळे (वय 4) आणि निधा आशिम शमशेद (वय 10) अशी कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या बालिकांची नावे आहेत. यापैकी आराध्या या बालिकेचा एक कान कुत्र्याने चावा घेतल्यामुळे तुटला आहे.
संबंधित पिसाळलेल्या कुत्र्याचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामपंचायतीकडे करूनही ग्रामसेवकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल गावकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
रक्तबंबाळ अवस्थेतील जखमी बालिकांना अधिक उपचारासाठी बेळगावच्या बिम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सदर घटना नंदगड पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत घडली आहे.