belgaum

बेळगाव लाईव्ह :जमिनीच्या व्यवहारातून दोन कुटुंबामध्ये उद्भवलेल्या वादाचे पर्यावसान वकिलाच्या कुटुंबातील 9 जणांवर 20 हून अधिक जणांच्या जमावाने अंगावर ट्रॅक्टर घालण्याबरोबरच खुरपे, कोयता, लोखंडी रॉड वगैरेंनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यामधील चेन्नापूर डीएलटी तांडा येथे घडली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कृष्णाप्पा लमानी कुटुंबातील सदस्यांनी वकील असलेल्या ॲड. विनोद पाटील यांच्या कुटुंबावर हल्ला केल्याचा आरोप आहे.

चेन्नापूर डीएलटी तांडा येथे घडलेल्या या घटनेत गंभीरित्या जखमी झालेल्या 9 जणांना उपचारासाठी बागलकोट सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हल्ल्यामध्ये ॲड. विनोद पाटील यांच्यासह त्यांचे वडील आणि भावाच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे.

एकंदर संपूर्ण पाटील कुटुंबीय सध्या बागलकोट सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. रामदुर्ग पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली असून जमिनीच्या वादातून सदर घटना घडली आहे. शेतातून परत येत असताना 20 हून अधिक जण असलेल्या जमावाने ॲड. पाटील यांच्या कुटुंबावर अचानक हल्ला केला.

यावेळी मोठ्या प्रमाणात झटापट आणि आरडाओरड होऊन परिसरात एकच खळबळ उडाली होती. मारहाण सुरू असताना हल्लेखोरांपैकी काहींनी पाटील यांच्या भावाच्या मुलीवर अतिप्रसंग करण्याचा आणि त्यांच्या भावाच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. सदर घटनेसंदर्भात आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी ॲड. विनोद पाटील यांनी केली आहे.

bottom

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.