बेळगाव लाईव्ह : मार्च महिना म्हणजे आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना, त्यामुळे बँका आणि सहकारी संस्था कर्जवसुलीवर भर देत आहेत. यामुळे शेतकरी, व्यापारी, आणि मध्यमवर्गीयांवरील ताण वाढला आहे.
रुपयाची घसरण, कर्जाच्या हप्त्यांचा वाढलेला भार आणि वाढती व्याजदरांची संरचना यामुळे सहकारी संस्था देखील अडचणीत आल्या आहेत. सध्या आर्थिक परिस्थिती अधिकच तणावग्रस्त होत चालली आहे. मार्च अखेर आल्याने सहकारी संस्था, उद्योगधंदे, आणि सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक ताण प्रचंड वाढला आहे. गुढीपाडवा आणि रमजानसारखे मोठे सण तोंडावर आल्याने घरगुती खर्चात वाढ झाली आहे, तर अमेरिकेच्या आर्थिक निर्णयांचा फटका देखील संपूर्ण बाजार व्यवस्थेला बसताना दिसत आहे.
रविवार दि. ३० मार्च रोजी साजरा होणार गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा सण आणि त्याच्यापाठोपाठ मुस्लिम बांधवांचा साजरा होणारा रमजान. या दोन्ही सणांमुळे बाजारपेठा गजबजलेल्या आहेत. मात्र, महागाईने लोकांचे बजेट बिघडवले आहे. खाद्यपदार्थ, कपडे, दैनंदिन उपयोगाच्या वस्तू आणि इंधन यांचे दर वाढले असून, सामान्य नागरिकांना खरेदी करताना आर्थिक गणित जुळवताना अडचणी येत आहेत. महागाईने नवा उच्चांक गाठला असून ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांचे बजेट कोलमडले आहे.
अमेरिकेने घेतलेल्या काही मोठ्या आर्थिक निर्णयांमुळे भारतीय बाजारपेठेत चलनवाढीचा प्रभाव स्पष्ट दिसत आहे. डॉलरच्या मजबूतीमुळे आयात महाग झाली आहे, ज्याचा परिणाम उद्योगधंद्यांवर आणि शेअर बाजारावर होत आहे. मोठे उद्योगधंदेच नव्हे, तर सहकारी संस्था आणि लघु उद्योगसुद्धा या आर्थिक संकटाच्या फेऱ्यात अडकले आहेत. महागाई आणि आर्थिक दबावाचा फटका सर्वसामान्य नागरिकांनाही बसला आहे. घरगुती खर्च, शिक्षण, आरोग्यसेवा आणि कर्जफेड यासाठी पैसे व्यवस्थापित करणे अधिक कठीण झाले आहे. उद्योगधंद्यांवरचा ताण वाढला असल्याने नोकऱ्यांमध्येही अस्थिरता आली आहे, ज्यामुळे अनेक कुटुंबे आर्थिकदृष्ट्या अस्वस्थ झाली आहेत.
मार्च महिना उद्योग, सहकार आणि नागरिकांसाठी तणावाचा काळ असतो. यंदा महागाई, सणांची तयारी आणि जागतिक आर्थिक स्थितीमुळे हा ताण अधिकच वाढला आहे. आर्थिक शिस्त आणि योग्य नियोजन करूनच या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकानेच खर्चावर नियंत्रण ठेवण्यासह अनावश्यक खर्च टाळून बचतीला प्राधान्य द्यावे. सहकारी संस्थांनी लवचिकता ठेवावी, कर्जवसुलीत काही प्रमाणात सवलत देऊन ग्राहकांशी समन्वय साधणे देखील तितकेच महत्वाचे आहे.