बेळगाव लाईव्ह : मतमोजणीपेक्षाही अधिक चुरशीच्या ठरलेल्या दक्षिण विधानसभा मतदार संघाच्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या निवड प्रक्रियेत रमाकांत कोंडुसकर यांच्या नावावर अधिकृत उमेदवार म्हणून शिक्कामोर्तब झाले आहे. शनिवारी सायंकाळी ५.०० वाजता निवड प्रक्रियेला सुरुवात झाली असून पोलीस आणि सीआरपीएफ जवानांच्या कडेकोट बंदोबस्तात हि निवड प्रक्रिया पार पडली.
पोलीस, सीआरपीएफ जवान आणि शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत हि चुरशीची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. निवड कमिटीचे अध्यक्ष नेताजी जाधव हे आजारी असल्यामुळे बैठकीला अनुपस्थित होते. यामुळे हंगामी अध्यक्ष म्हणून अनिल अमरोळकर यांनी कामकाज पहिले. याचप्रमाणे राजू बिर्जे, महादेव पाटील आणि दत्ता उघाडे यांच्या उपस्थितीत पुढील कामकाज सुरु करण्यात आले.
दक्षिण मतदार संघाच्या उमेदवार निवडीची प्रक्रिया गेल्या आठवड्यापासून सुरु होती. बैठकीदरम्यान काहींनी उमेदवार निवड प्रक्रियेवर आक्षेप घेतला. त्यानंतर जनमतावर आधारित उमेदवाराची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. निवड कमिटीच्या पाच सदस्यांनी जनमत वाचून दाखविले.
यावेळी ८० टक्के जनमत हे रमाकांत कोंडुसकर यांच्याबाजूने आले. यामुळे जनमतावर आधारित उमेदवार निवड करून रमाकांत कोंडुसकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. हा निर्णय सर्वानुमते संमत करण्यात आला.
निवड समितीतील एकूण ८७ सदस्यांपैकी ८४ सदस्यांच्या उपस्थितीत जनमत आणि निवड कमिटीचा निर्णय सर्वानुमते मान्य करण्याचा दुजोरा देण्यात आला आहे.