बेळगाव लाईव्ह :महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणाऱ्या बेळगाव जिल्ह्यातील अकुशल कामगारांचे दैनंदिन सुधारित वेतन येत्या 1 एप्रिल 2025 पासून 349 रुपयांवरून 370 रुपये इतके करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राहुल शिंदे यांनी दिली.
नरेगा योजनेअंतर्गत दैनंदिन कामासाठी पुरुष आणि महिलांसाठी समान वेतन 370 पर्यंत वाढवले आहे. त्यामुळे त्यांना एका आर्थिक वर्षात 100 दिवस कामाचे 37 हजार रुपये मिळतील. हे पैसे कामगारांच्या खात्यात थेट जमा केले जातीत.
भिन्न क्षमतेची व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांसाठी कामामध्ये 50 टक्के सूट दिली जाईल. शेतकरी आणि मजुरांच्या घरी गुरेढोरे, मेंढ्या, कोंबड्या असतील तर नरेगा प्रकल्पांतर्गत शेड बांधता येतील आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत होता येईल, असे सीईओ शिंदे यांनी पुढे सांगितले. नरेगा प्रकल्प सुलभ करण्यासाठी जॉब कार्ड असणे आवश्यक आहे.
नरेगा योजनेअंतर्गत केवळ मजुरीच नाही तर जमीन असलेल्या शेतकऱ्यांना रेशीम शेतीसोबतच शेतातील जीवन, शेती तलाव, बागायती पिके, डाळिंब, शेवगा लागवड करण्याची परवानगी आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 7.98 लाख जॉब कार्ड जारी करण्यात आले आहेत.
चालू वर्षात नरेगा प्रकल्पांतर्गत 103 लाख मानवी दिवस तयार करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील लोकांनी 2025-26 पर्यंत या प्रकल्पाचा लाभ घ्यावा. तसेच अधिक माहितीसाठी ग्रामपंचायत, तालुका पंचायतींना भेट द्यावी आणि युनिफाइड हेल्पलाइन क्रमांक: 8277506000 वर संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले.