बेळगाव लाईव्ह :बेळगाव महानगर पालिकेची महापौर व उपमहापौर निवडणूक येत्या शनिवार दि. 15 मार्च 2025 रोजी होणार असून महापौर पदाचे आरक्षण सामान्य श्रेणी तर उपमहापौर पदाचे आरक्षण सामान्य महिला असे असणार आहे.
बेळगाव महापालिकेच्या 23व्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीचे वेळापत्रक अखेर प्रादेशिक आयुक्तांनी काल बुधवारी जाहीर केले आहे. त्यानुसार येत्या शनिवारी 15 मार्च रोजी महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक होणार आहे.
सत्ताधारी भाजप गटाच्या दोन नगरसेवकांना अपात्र ठरविण्यात आल्यामुळे महापालिकेतील नगरसेवकांची संख्या 56 इतकी कमी झाली आहे.
या नगरसेवकांसह खासदार, आमदार आणि विधान परिषद सदस्यांची मते लक्षात घेता महापालिकेतील मतांची एकूण संख्या 63 वर पोहोचली आहे. भाजपची निवडून आलेले नगरसेवक 33 असून त्यांना दोघा स्वतंत्र उमेदवारांचा पाठिंबा आहे.
काँग्रेसचे 10 नगरसेवक निवडून आले असून त्यांना एआयएमआयएमच्या एकासह उर्वरित अपक्ष उमेदवारांचा पाठिंबा आहे.
प्रादेशिक आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची वेळ 15 रोजी सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत असणार आहे. त्यानंतर उपस्थित असलेल्या सदस्यांची हजेरी, गणपूर्ती पडताळणी, अर्ज पडताळणी, दाखल झालेल्या अर्जांची घोषणा, अर्ज माघार घेणे, रिंगणातील उमेदवारांची घोषणा, बिनविरोध झाल्यास निकाल घोषणा, एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास हात उंचावून मतदान, त्यानंतर मतमोजणी व अंतिम निकाल या पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.