बेळगाव लाईव्ह : विवाह मुहूर्तावर लावून समाजासमोर आदर्श निर्माण करा असे आवाहन उद्योजक टोपाण्णा पाटील यांनी केले.
मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे ओरिएंटल हायस्कूल येथील तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन येथे वधू वर महा मेळाव्यात पाटील प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे , कार्याध्यक्ष शिवराज पाटील, वधू वर मंडळ प्रमुख ईश्वर लगाडे व खजिनदार के एल मजूकर उपस्थित होते.
मराठा समाजातील लग्ने वेळेवर न लागल्याने समाजाबद्दल चुकीचा संदेश इतर समाजात जात असल्याने यापुढे लग्न वेळेवर व मुहूर्तावर लावण्याची जबाबदारी मुलांच्या पालकांची आहे तसेच हल्ली दोन वेळा लग्न लावण्याचे फॅड वाढत चालले असून मुहूर्तावर एकदाच लग्न लावावे अशी अपेक्षाही श्री. पाटील यांनी व्यक्त केली.
अवाढव्य अपेक्षा न बाळगता तडजोडीची भूमिका घ्यावी असे आवाहन करतानाच वरातीत नाचण्यात समाजातील मोठ्या संख्येने महिलां वर्गाचा सहभाग याबद्दल श्री मरगाळे यांनी खंत व्यक्त केली .
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला श्री पाटील यांनी यांनी पुष्पहार अर्पण केला तर कै.नारायणराव जाधव यांच्या तसबिरीचे पूजन श्री मरगाळे यांनी केले. यावेळी वधू वर मंडळाचे सदस्य ईश्वर लगाडे , के.एल.मजूकर संग्राम गोडसे, राजू पावले, कविता देसाई यांनी वर्षेभर केलेल्या कार्याचे कौतुक करण्यात आले.
सुरवातीला शिवराज पाटील यांनी प्रास्ताविक करताना वाढत्या घटस्फ़ोटाबद्दल चिंता व्यक्त केली. ईश्वर लगाडे यांनी वधू वर मंडळाचा आढावा घेतला. संग्राम गोडसे यांनी आभार मानले तर सुत्रसंचालन के एल मजूकर यांनी केले .
यावेळी कोल्हापूर, पुणे, मुंबई, गोवा, धारवाड व बंगलोर येथून वधू वर व पालक उपस्थित होते.
मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी दत्तात्रय जाधव, रघुनाथ बाडगी, शीतल देसाई, विनोद आंबेवाडीकर, सुनिल लगाडे यांनी परिश्रम घेतले.