बेळगाव लाईव्ह : होळी सणाच्या तोंडावर बेळगाव शहरात पोलिसांनी मोठी कारवाई करत ६७० लिटर बेकायदा दारूसाठा जप्त केला आहे. गोवा राज्यात विक्रीसाठी असलेला हा मद्यसाठा बेकायदा जमा करून ठेवण्यात आला होता.
खडेबाजार पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकत आरोपीला अटक केली असून, एकूण १०.३० लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
११ मार्च २०२५ रोजी खडेबाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील न्यू गडशेड रोड येथे मोठ्या प्रमाणात अवैध मद्यसाठा आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे, बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग, उपायुक्त (कायदा व सुव्यवस्था), रोहन जगदीश, उपायुक्त (गुन्हे), निरंजनराज अरस आणि खडेबाजार उपविभागाचे एसीपी शेखरप्पा एच. यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
खडेबाजार पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीशैल गाबी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंद आदगोंड व कर्मचारी ए. बी. शेट्टी, बी. एस. रुद्रापूर, बी. एल. सर्वी, भरामण्णा करेगार, संतोष बरगी, सदाशिव हलगीमनी, चन्नप्पा तेली, ए. एस. हेगण्णा यांनी छापा टाकला.
या कारवाईत राकेश अनिल चौगले (वय ३०, रा. न्यू गडशेड रोड, बेळगाव) याला अटक करण्यात आली असून त्याच्या ताब्यातून ७.३० लाख रुपये किमतीच्या ६७० लिटर गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्या तसेच केए-२४-९०४९ क्रमांकाची टाटा कंपनीची गुड्स वाहतूक करणारी गाडी (किंमत ३ लाख रुपये) असा एकूण १०.३० लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.
या यशस्वी कारवाईबद्दल खडेबाजार पोलिस ठाण्याच्या पथकाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.