बेळगाव लाईव्ह:बेळगावातील खाजगी जय किसान होलसेल भाजी मार्केटला कर्नाटक कृषी उत्पन्न नियंत्रण कायद्याच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कृषी खात्याच्या संचालकांनी कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याची माहिती भारतीय कृषक समाज कर्नाटक राज्याध्यक्ष सिदगौडा मोदगी यांनी दिली.
शहरातील कन्नड साहित्य भवन येथे आज बुधवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. जय किसान होलसेल व्हेजिटेबल मार्केट असोसिएशनला कर्नाटक कृषी उत्पन्न नियंत्रण कायद्याच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल तुमच्यावर कारवाई का करू नये? अशी नोटीस कृषी खात्याच्या संचालकांनी बजावली आहे.
तसेच आठवड्याभरात नोटिसीला लेखी स्वरूपात उत्तर न दिल्यास आवश्यक कारवाई करावी लागेल, असा इशारा दिला आहे. ही नोटीस म्हणजे आमच्या संघटनेने सातत्याने केलेल्या आंदोलनाची दखल घेत सरकारने उचललेले पाऊल म्हणावे लागेल.
सदर नोटीस जारी होताच कारवाई टाळण्यासाठी राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. तरी कृपया त्याची दखल घेतली जाऊ नये. कायद्याच्या चौकटीत पारदर्शक व्यवहार व्हावा यासाठी जय किसान भाजी मार्केट मधील व्यापाऱ्यांनी सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेत स्थलांतरित व्हावे. कारण माझ्यामते नोटीसीला उत्तर देण्यासारखी त्यांच्याकडे सबळ कारणे नाहीत. त्यामुळे व्यापाऱ्यांनी आपले नुकसान करून घेऊ नये, असे मोदगी पुढे म्हणाले.
खाजगी जय किसान भाजी मार्केट मधील व्यापारी आमचे विरोधक नाहीत. आपण सर्वांनी कृषी उत्पन्न बाजारपेठेत एकत्र समन्वयाने शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादनांना योग्य भाव देऊन पारदर्शक व्यवहार करणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांनी देखील याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन सिदगौडा मोदगी यांनी भारतीय कृषक समाजातर्फे केले. पत्रकार परिषदेस संघटनेचे अन्य पदाधिकारी व शेतकरी नेते उपस्थित होते.