बेळगाव लाईव्ह :घनकचरा व्यवस्थापन आणि शाश्वततेच्या प्रयत्नांमध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत बेळगाव महानगरपालिकेला 135 कोटी रुपयांचे महत्त्वपूर्ण अनुदान देण्यात आल्याची घोषणा केंद्रीय शहर विकास मंत्री मनोहर लाल यांनी जयपूर (राजस्थान) येथे नुकत्याच पार पडलेल्या परिषदेत केली. हा निधी शहराच्या एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन आणि शाश्वतता प्रकल्पाला पाठिंबा देणारा ठरणार आहे.
स्मार्ट सिटी प्रकल्पांसाठी केंद्र सरकारच्या पुढाकार असलेल्या सीटीज 2.0 च्या आव्हानात बेळगावच्या यशस्वी सहभागामुळे हे मोठे अनुदान मिळाले आहे. देशातील सहभागी 84 शहरांपैकी बेळगाव हे 18 विजेत्यांपैकी एक म्हणून उदयास आले असून विशेष म्हणजे हा निधी मिळवणारे कर्नाटकातील एकमेव शहर ठरले आहे.
बेळगाव स्मार्ट सिटी आणि बेळगाव महापालिका (बीसीसी) यांच्यातील सहकार्याने केलेला हा प्रस्ताव मार्च 2024 मध्ये बेळगाव स्मार्ट सिटीच्या व्यवस्थापकीय संचालक सईदा आफ्रीन बानू बळ्ळारी यांनी पंचांसमोर सविस्तरपणे सादर केला होता. निधीची घोषणा करण्याबरोबरच केंद्रीय शहरी विकास मंत्रालय, कर्नाटक शहरी पायाभूत सुविधा विकास आणि वित्त महामंडळ (केयूआयडीएफसी) बेंगलोर, बेळगाव स्मार्ट सिटी आणि बीसीसी यांच्यात कचरा विल्हेवारी संबंधीच्या चतुर्भुज करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
बेळगावच्या नाविन्यपूर्ण घनकचरा व्यवस्थापनाची अंमलबजावणी 3 वर्षांच्या कालावधीत करण्याच्या वचनबद्धतेला औपचारिकता देणारा हा करार असून सदर प्रकल्प मार्च 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.
या प्रकल्पाचे उद्दिष्ट शहराच्या घनकचरा व्यवस्थापन पद्धतींमध्ये लक्षणीय वाढ करणे आहे. करारावर स्वाक्षरी करतेवेळी केंद्रीय शहरी व्यवहार विभागाच्या संचालक रूपा मिश्रा, केयूआयडीएफसी बेंगलोरच्या व्यवस्थापकीय संचालक शरथ, बेळगाव स्मार्ट सिटीच्या व्यवस्थापकीय संचालक सईदा आफ्रीन बानू बळ्ळारी आणि बेळगाव महापालिकेच्या आयुक्त शुभा बी. यांच्यासह संबंधित इतर अधिकारी उपस्थित होते.