बेळगाव लाईव्ह: बेळगाव येथील एका तरुणाची निर्मिती असलेला आणि राॅटरडॅम आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रीमियर शो झालेल्या ‘फॉलोवर’ हा चित्रपट सीमावाद निर्माण करणारा आहे असा आरोप करत कर्नाटक रक्षण वेदीकेच्या मूठभर कार्यकर्त्यांनी बेळगावातील त्याच्या प्रदर्शनाला आक्षेप घेत चित्रपट बंद पाडल्याची घटना काल शुक्रवारी आयनॉक्स चित्रपटगृहाच्या ठिकाणी घडली.
बेळगावमध्ये बीई अभ्यासक्रम शिकणाऱ्या हर्षद नलवडे या विद्यार्थ्याने ‘फॉलोवर’ चित्रपट निर्माण केला आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झालेला हा दर्जेदार चित्रपट शहरातील आयनॉक्स चित्रपटगृहात लावण्यात आला आहे. मात्र काल शुक्रवारी हा चित्रपट सीमावाद निर्माण करणारा आहे असा आरोप करत चित्रपटाच्या प्रदर्शनाला कर्नाटक रक्षण वेदिकेच्या शिवरामेगौडा गटाने तीव्र विरोध केला.
यावेळी चित्रपटाचे निर्माते व इतर मंडळींनी त्यांना शांत करत फॉलोवर चित्रपटाबद्दल माहिती दिली. हा चित्रपट सीमावादावर नव्हे तर मैत्रीवर बेतला आहे असे स्पष्ट करून समजावण्याचा प्रयत्न केला. तथापि शिवरामेगौडा याच्या नेतृत्वाखालील करवे कंपूने आपली निदर्शने व अरेरावी सुरूच ठेवत गोंधळ घालून चित्रपट बंद पाडला. त्याचप्रमाणे बेळगाव मधील चित्रपटगृहांमध्ये कन्नड वगळता मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील चित्रपट दाखवले गेले तर चित्रपटगृहच बंद पाडले जाईल, अशी वल्गना देखील केली. करवेच्या या आंदोलनाची माहिती मिळताच खडेबाजार उपविभागाचे एसीपी शेखरप्पा आणि कॅम्प पोलीस ठाण्याचे सीपीआय यांनी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. चित्रपटाचे प्रदर्शन रद्द झाल्यानंतर चित्रपटगृह चालकांनी चित्रपट पाहण्यास आलेल्या प्रेक्षकांना त्यांचे तिकिटाचे पैसे परत केले.
या घटनेनंतर बोलताना बेळगावमध्ये फक्त मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील चित्रपट प्रदर्शित केले गेले तर कन्नड चित्रपट कुठे प्रदर्शित होणार? आयनॉक्स चित्रपटगृहात प्रदर्शित होणाऱ्या मराठी चित्रपटांवर बंदी घालावी अन्यथा कर्नाटक रक्षण वेदिके शिवरामेगौडा गटाला सदर चित्रपटगृह बंद करावे लागेल, असा इशारा वाजिद हिरेकोडी यांनी दिला.
दुसरीकडे “जर कर्नाटक आणि महाराष्ट्रातील लोकांना कांही अडचण नाही तर या संघटनांना काय अडचण आहे?” असा सवाल फॉलोवर चित्रपटाच्या टीमने केला असून आपल्या चित्रपटात सीमावाद असल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. तसेच हा चित्रपट तीन मित्रांबद्दल आहे, ज्यांना त्यांचे वाद मिटवण्यास सांगितले जाते, असेही त्यांनी स्पष्ट केले. आम्ही बेळगावच्या लोकांनी हा चित्रपट बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे.
राॅटरडॅम आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाचा प्रीमियर झाला आहे. हा चित्रपट देश-विदेशातील प्रेक्षकांच्या प्रशंसेस पात्र ठरला आहे. तीन मित्रांवर आधारित या चित्रपटाचे नांव देखील कन्नड भाषेत लिहिले गेले आहे, असेही फॉलोवर चित्रपटाबद्दल सांगण्यात आले.
दरम्यान, बेळगावच्या मुलांनी एकत्र येऊन, पाच -सहा वर्षे मेहनत घेऊन फॉलोवर हा चित्रपट बनवला. काल तो आयनॉक्समध्ये प्रदर्शित होणार होता. पण ‘करवे’ या तथाकथित संघटनेचे तीन -चार म्होरके येऊन तो चित्रपट पाहण्याआधीच केवळ त्याचा ट्रेलर पाहून त्याला भाषिक रंग चढवून तो चित्रपट प्रदर्शित होऊ देत नाहीत. याचा काय अर्थ? आम्हा कलाकारांना काही स्वातंत्र्य आहे की नाही? प्रत्येक कलाकृतीला भाषिक किंवा राजकीय रंग चढवला गेला तर कलाकारांनी करायचे काय? अशी परखड प्रतिक्रिया बेळगावच्या नीता कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे.