बेळगाव लाईव्ह ;प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्याप्रसंगी गेल्या 14 जानेवारी रोजी घडलेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या बेळगाव जिल्ह्यातील चार भाविकांच्या कुटुंबीयांना सरकारकडून 25 लाख रुपये सहाय्य निधी देण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.
बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज बुधवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. महाकुंभ मेळ्याप्रसंगी गेल्या 14 जानेवारी रोजी प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीची दुर्घटना घडून बेळगावच्या 4 भाविकांचा त्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला ही अतिशय दुख:द घटना होती.
सदर दुर्घटनेनंतर मृत्यूमुखी पडलेल्या ज्योती, मेघा, महादेवी व अन्य एक अशा चौघांसंदर्भात मी प्रयागराजच्या जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा केली. त्यानंतर सदर मृतांच्या कुटुंबीयांना सरकारकडून 25 लाख रुपयांचे सहाय्यधन पोहोचवण्याचे काम आम्ही केले आहे. संबंधित प्रत्येक मृतांच्या कुटुंबीयांच्या बँक खात्यावर 25 -25 लाख रुपये जमा झाले आहेत.
याव्यतिरिक्त संबंधित कुटुंबीयांनी उत्तरीय तपासणी अहवाल आणि मृतांच्या मृत्यू दाखल्यात काही शुद्धलेखनाच्या चुका झाल्यात त्या दुरुस्त करण्याची विनंती केली होती. त्यासंदर्भातही मी प्रयागराजच्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली असून येत्या दोन दिवसात त्यांनी उत्तरीय तपासणीचा अहवाल आणि मृत्यूच्या दाखल्यातील चुका दुरुस्त करून त्या बेळगाव जिल्हा प्रशासनाकडे पाठवण्याचे आश्वासन दिले आहे अशी माहिती जिल्हाधिकारी रोशन यांनी दिली.
याप्रसंगी पत्रकारांनी भाषिक अल्पसंख्यांक हक्काबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना भाषेचा अधिकार सर्वांना मिळाला हवा. मात्र त्याच्या अंमलबजावणीसाठी कायदेशीर सल्ला घेतला जाईल. सध्या बेळगाव जिल्ह्यात सौहार्दपूर्ण शांततेचे वातावरण आहे असे सांगून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची असते.
कोणतीही समस्या उद्भवल्यास पोलीस व महसूल विभाग त्याची कल्पना प्रथम आम्हाला देत असते. सध्या जिल्ह्यात शांततापूर्ण वातावरण आहे हे वातावरण बिघडवून कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केलास त्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिला.