बेळगाव लाईव्ह :धार्मिक पर्यटन आणि स्थानिक पायाभूत सुविधांना मोठी चालना देण्याच्या उद्देशाने केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी बेळगावातील सौंदत्ती येथील प्रसिद्ध श्री रेणुका यल्लम्मा देवी मंदिराच्या विकास प्रकल्पाला मंजुरी देण्याची घोषणा केली आहे. तीर्थयात्रा पुनरुज्जीवन आणि आध्यात्मिक वारसा वाढ अभियान (प्रसाद) योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या या प्रकल्पासाठी 18.37 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
कर्नाटक आणि कर्नाटक बाहेरील भाविकांसाठी एक महत्त्वाचे आध्यात्मिक स्थळ असलेल्या या मंदिरात पर्यटकांचा अनुभव वाढवण्याच्या उद्देशाने परिवर्तन केले जाणार आहे. दरवर्षी मंदिरात येणाऱ्या हजारो भाविकांसाठी चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी नियोजित विकासात तीर्थयात्री आगमन केंद्र, एक कॅफेटेरिया आणि प्रथमोपचार केंद्र यांचा समावेश आहे.
केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी सोशल मीडियावर या वृत्ताला दुजोरा देत म्हटले आहे की, आज आमच्या पर्यटन मंत्रालयाने प्रसाद योजनेअंतर्गत कर्नाटकातील बेळगावच्या सौंदत्ती येथील श्री रेणुका यल्लम्मा मंदिराच्या विकास प्रकल्पाला मान्यता दिली आहे.
सदर मंदिर 18.37 कोटी रुपये खर्चून यात्रेकरू आगमन केंद्र (पिलग्रीम अरायव्हल सेंटर), कॅफेटेरिया, प्रथमोपचार केंद्र आणि इतर आधुनिक सुविधांनी सुसज्ज केले जाईल. याचा मंदिरा देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांना मोठा फायदा होईल.
या उपक्रमामुळे केवळ तीर्थयात्रेचा अनुभव सुधारेलच असे नाही तर या प्रदेशातील धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल. ज्याद्वारे देशभरातील पर्यटक येथे येतील अशी अपेक्षा आहे. या प्रकल्पामुळे श्री रेणुका -यल्लम्मा देवी मंदिर सुव्यवस्थित धार्मिक पर्यटन पायाभूत सुविधांचा एक आदर्श (मॉडेल) बनणार आहे.
सौंदत्ती येथील रेणुका देवी मंदिराचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे 100 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून समजती डोंगराचा विकास केला जाणार आहे. सदर अनुदानापैकी पहिल्या टप्प्यातील 18 कोटी 37 लाख रुपयांच्या अनुदानातून हाती घेतल्या जाणाऱ्या विकास कामांना परवानगी देण्यात आली आहे.
पहिल्या टप्प्यात भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यासाठी भव्य प्रसादालय निर्माण करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. एकंदर येत्या काळात केंद्र आणि राज्य सरकारच्या अनुदानातून सौंदत्ती येथील श्री रेणुका -यल्लमा देवी मंदिर परिसराचा कायापालट झाल्याचे दिसून येणार आहे.