बेळगाव लाईव्ह : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर एका ट्रक चालकाकडून पैसे घेत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या प्रकरणी हिरेबागेवाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक (ASI) यांच्यावर प्रशासनाने कारवाई केली आहे.
सदर व्हिडिओमध्ये दोन पोलिस अधिकारी एका ट्रक चालकासोबत काही चर्चा करताना आणि त्यानंतर त्याच्याकडून पैसे घेत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
या घटनेची गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात आली असून, पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
दरम्यान, पोलिस विभागाने अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी कडक पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे. महामार्गावर अशा घटना घडू नयेत यासाठी प्रशासन काय उपाययोजना करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.