बेळगाव लाईव्ह : आंबेवाडी ग्रामपंचायतीचे सचिव बसवराज कोडळी यांनी मंगळवारी व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण दिले आहे.माझ्यावर हल्ला करणारे वेगळे आहेत.
मात्र, या प्रकरणात कन्नड किंवा मराठी भाषेचा उल्लेख करणे चुकीचे आहे. माझ्यावर झालेल्या गंभीर हल्ल्यानंतर कन्नड आणि मराठी भाषिक दोघांनीही मला मदत केली आणि रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे याला कोणत्याही भाषिक वादाशी जोडू नये, असे आवाहन त्यांनी केले.
सोमवारी, १० मार्च रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास आंबेवाडी-मण्णूर रोडवर सचिव बसवराज कोडळी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. मोटारसायकलवरून जात असताना त्यांना अडवून रॉडने मारहाण करण्यात आली असून त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. सचिवावर हल्ल्याची बातमी कळताच मनरेगा योजनेतून आंबेवाडी परिसरात तलावाचे काम करणारे मजूरही हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. दरम्यान, आंबेवाडीत मनरेगा योजनेतून तलावाचे काम सुरू आहे. पीडीओ आणि सचिव नागाप्पा कोडळी हे दोघे पाहणीसाठी आंबेवाडीत गेले होते.
पीडीओ तिथेच थांबले, तर नागाप्पा आपल्या मोटारसायकलवरून आंबेवाडीकडे येत होते. त्याच वेळी, तिघांनी त्यांना अडवून हल्ला केला. बेकायदा कामांसाठी काही सदस्य व त्यांच्या कुटुंबीयांकडून माझ्यावर दबाव टाकण्यात येत होता. मी ती कामे केली नाहीत, म्हणून मला संपविण्यासाठी हा हल्ला करण्यात आला, यामध्ये कोणताही भाषिक वाद आणू नये, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.


