Friday, February 21, 2025

/

यंदे खुट येथील सिग्नल यंत्रणा सुरू करण्याची मागणी

 belgaum

बेळगाव लाईव्ह :गेल्या कित्येक दिवसांपासून सिग्नल व्यवस्था बंद असल्यामुळे शहरातील यंदे खुट येथील मनमानी स्वैर धोकादायक रहदारीची गांभीर्याने दखल घेऊन एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी पोलीस प्रशासनाने या चौकातील सिग्नल यंत्रणा तात्काळ सुरू करावी अथवा येथे कर्तव्यदक्ष पोलिसांची नियुक्ती करावी, अशी मागणी जागरूक नागरिकांकडून केली जात आहे.

शहरातील प्रमुख रस्त्यांपैकी एक असलेल्या कॉलेज रोडवरील यंदे खूट या चौकातील सिग्नल यंत्रणा गेल्या कित्येक दिवसांपासून बंद पडली असून तिच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी सिग्नलचे नियंत्रण नसल्यामुळे या चौकात बेबंद मनमानी वाहतूक सुरू असते.

या ठिकाणी रहदारी पोलिसांची नियुक्ती केलेली असली तरी चौकातील वाहतुक नियंत्रणाची जबाबदारी पार पाडण्याऐवजी हे पोलीस विना हेल्मेट दुचाकीस्वारांना अडवून चिरमिरे गोळा करण्यात किंवा स्वतःच्या मोबाईलवर बोलण्यातच अधीक काळ गुंतलेले असतात. त्यामुळे चौकात वारंवार वाहतुकीची कोंडी होत असते.

बऱ्याचदा किरकोळ अपघातही घडतात. दिवसभर रात्री उशिरापर्यंत कायम मोठी रहदारी असणाऱ्या यंदे खूट चौकाजवळ बेननस्मिथ, वनिता विद्यालय, सेंट झेवियर्स, ज्योती कॉलेज वगैरे शैक्षणिक संस्था आहेत. त्यामुळे सदर चौकातून पादचारी नागरिकांसह विद्यार्थी -विद्यार्थिनींची देखील ये -जा सुरू असते.

या सर्वांना यंदे खूट चौकातील बेलगाम रहदारीमुळे जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो. तेंव्हा या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन पोलीस प्रशासनाने यंदे खूट येथे एखादी गंभीर दुर्घटना घडण्याची प्रतीक्षा न करता या ठिकाणची सिग्नल यंत्रणा तात्काळ दुरुस्त करून सुरू करावी अशी जोरदार मागणी परिसरातील जागरूक नागरिकांकडून केली जात आहे.

यासंदर्भात बेळगाव लाईव्हशी बोलताना समादेवी गल्ली येथील रहिवासी नंदन बागी यांच्यासह व्यावसायिक डी. बी. पाटील यांनी यंदे खूट येथे सिग्नल नसल्यामुळे निर्माण होत असलेली समस्या व त्रासाची माहिती दिली. या चौकात कर्तव्यदक्ष रहदारी पोलिसांची नियुक्ती केली जावी सध्या जे पोलीस नियुक्त करण्यात आले आहेत ते रहदारी नियंत्रण करण्याऐवजी स्वतःच्या मोबाईल फोनवर बोलण्यामध्ये किंवा विना हेल्मेट दुचाकीचा स्वारांना पकडण्यात व्यस्त असतात.Yande khut

त्यामुळे वाहन चालक या चौकातून आपली वाहने मनमानी हाकत असतात. याचा नागरिकांना विशेष करून शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी विद्यार्थिनींना त्रास होत असतो. चौकात रहदारी पोलिसांकडून वाहतुकीचे नियंत्रण केले जाणे अत्यावश्यक असताना दुर्दैवाने तसे घडत नाही.

तरी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन येथील सिग्नल व्यवस्था तात्काळ कार्यान्वित करावी अथवा या ठिकाणी नियुक्त रहदारी पोलिसांना समज देऊन चांगल्या पद्धतीने आपले कर्तव्य पार पाडण्याची सूचना करावी, अशी मागणी बागी व पाटील यांनी केली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.