Monday, February 10, 2025

/

कुस्ती क्षेत्राच्या भविष्याबद्दल तज्ञांची चिंता

 belgaum

बेळगाव लाईव्ह : ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा वादाच्या भोवऱ्यात अडकली असून याची चर्चा आता बेळगावमध्येही रंगू लागली आहे. पुणे जिल्ह्यातील पृथ्वीराज मोहोळ याने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत ‘महाराष्ट्र केसरी’ किताब जिंकला असला तरी उपांत्य फेरीतील वादग्रस्त घटना आणि राजकारणाचे आरोप या स्पर्धेला वादाच्या भोवऱ्यात ढकलले आहेत. महाराष्ट्रातील अहिल्यानगर येथील स्व. बलभीम अण्णा जगताप क्रीडा नगरीत यंदाची ‘महाराष्ट्र केसरी’ किताबाची अंतिम लढत रविवारी पार पडली. या लढतीत पुणे जिल्ह्यातील पृथ्वीराज मोहोळ याने सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याला पराभूत करत ‘महाराष्ट्र केसरी’ किताब पटकावला. तथापि, उपांत्य फेरीतील वादग्रस्त घटनेमुळे या स्पर्धेवर वादाचे सावट पसरले आहे.

उपांत्य फेरीत, डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे (नांदेड) याने पंचांच्या निर्णयावर आक्षेप घेत पंचांना लाथ मारली. त्याआधी, राक्षे याने ‘मी पराभूत झालेलो नाही. माझे दोन्ही खांदे टेकले नव्हते’ असा दावा करत व्हिडिओ रिव्ह्यूची मागणी केली होती. राक्षे याच्या या वागणुकीमुळे महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात खळबळ उडाली आहे. काही तज्ञांच्या मते, महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात राजकारण खेळले जात आहे. शिवराज राक्षे सारखे अस्सल पैलवान या राजकारणाचा बळी ठरले आहेत. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी आरोप केला आहे की, ‘पैलवानांचे करिअर दहा सेकंदात उध्वस्त करण्याचा अधिकार पंचांना कोणी दिला?’ चंद्रहार पाटील यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, ‘अशा पंचांना लाथ नाही, गोळ्या घातल्या पाहिजेत.’

गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्रातील राजकारणावर आरोप होत आहेत. महाराष्ट्राचे ज्येष्ठ मातब्बर कुस्तीपटू काका पवार यांनी ‘महाराष्ट्र केसरी’ किताबाच्या स्पर्धेपूर्वीच महाराष्ट्र कुस्ती परिषदेत कोण ‘महाराष्ट्र केसरी’ ठरवायचा हे ठरवले जाते असा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे, कुस्तीतील निवडक राजकारणाच्या जोखडाखाली, एकनिष्ठ आणि मेहनत घेणारे पैलवान या क्षेत्रात संघर्ष करत आहेत. वाढत्या राजकारणामुळे कुस्तीला वाहून घेतलेल्या पैलवानांना आपल्या कलेत आदर मिळवणे कठीण होईल. ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला चार पदके मिळाली. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील आणि देशातील कुस्ती क्षेत्रातील राजकारण आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकांच्या संधीवर परिणाम करत आहे.

महाराष्ट्राचे राजकारण कुस्तीला नीट रुळावर आणले पाहिजे आणि कुस्तीला एकनिष्ठ असलेल्या अस्सल पैलवानांचे यश मिळविण्याचे वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. शिवराज राक्षे सारखे पराभूत असलेल्या पैलवानांना हे लक्षात घेऊन राजकारणाच्या चक्रातून मुक्त करून त्यांना त्यांच्या योग्य स्थानावर पोहोचवण्याची गरज आहे. 2036 च्या ऑलिम्पिक खेळांसाठी भारत या यजमानपदासाठी इच्छुक आहे, पण त्यासाठी कुस्ती क्षेत्रातील राजकारणाच्या कचाट्यातून महाराष्ट्रासह देशाला बाहेर पडावे लागेल.

कोल्हापूरच्या तुलनेत बेळगावच्या देखील अनेक कुस्तीपटूंनी देशभरात नाव कमावलं. बेळगावमध्ये अनेक तालीम सध्या कार्यरत असून या तालमीच्या माध्यमातून असंख्य कुस्तीपटूंननी कुस्ती क्षेत्रात नाव कमावले आहे. बेळगाव येथील मराठा सेंटर,बहुसंख्य कुस्ती मंडळे, जिल्हा कुस्ती संघटना सारख्या अनेक संघटना बेळगावमध्ये कार्यरत आहेत. बेळगावमध्ये विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात कुस्ती आखाडा भरविला जातो. मातीच्या कुस्तीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या बेळगावमध्ये कुस्ती क्षेत्रात सुरु असलेल्या राजकारणावरून नाराजी व्यक्त होत आहे. कुस्ती क्षेत्रात ऑलिम्पिक मध्ये पदकांची संख्या कमी आहे यासाठी या क्षेत्रात सुरु असलेले राजकारण कारणीभूत आहे असा आरोप होऊ लागला आहे. कुस्तीमध्ये राजकारण येता कामा नये, यामुळे कुस्ती क्रीडाप्रकार आणि या क्रीडाप्रकारातील भारतीय कुस्तीपटू पिछाडीवर येत असल्याचेही बोलले जात आहे. २०३६ साली होणाऱ्या ऑलिम्पिक मध्ये भारतीय कुस्तीपटूंनी अधिकाधिक पदके पटकवावीत यासाठी खेळात कोणतेही राजकारण येता कामा नये, राजकारणमुक्त खेळ म्हणूनच हा क्रीडाप्रकार अबाधित राहावा असा सूर कुस्तीपटू, कुस्तीप्रेमी शौकिनांमधून उमटत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.