बेळगाव लाईव्ह : बेळगाव येथील मराठा रेजिमेंट सेंटरला आणखी एक अभिमानाची बाब असून मराठा सेंटरमध्ये यापूर्वी सेवा बजावलेले बेळगाव लगतच्या चंदगड तालुक्यातील मांडेदुर्गचे सुपुत्र असलेले आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक रामचंद्र पवार यांची टीआयडीसी (TIDC) ) सदस्य पदी निवड झाली आहे.
केंद्र शासनाच्या टैलेंट आयडेंटिफिकेशन डेव्हलपमेंट कमिटीवर (टीआयडीसी प्रतिभा विकास ओळख समिती) भारतीय आशियाई कुस्ती संघाचे प्रशिक्षक रामचंद्र पवार यांची तज्ज्ञ सदस्य म्हणून निवड झाली. मूळचे मांडेदुर्ग (ता. चंदगड) येथील रहिवासी असलेले पवार भारतीय सैन्यदलात कुस्ती प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी युथ ऑलिंपिक गेमसह जागितक कुस्ती स्पर्धेत भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून काम केले आहे, तर सध्या पंजाबमधील भारतीय खेल प्राधिकरणच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्टस्मध्ये प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.त्यांनी यापूर्वी बेळगावातील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर मध्ये सेवा बजावली आहे बेळगाव शहरातच स्थायिक असून बेळगावचे जावई आहेत.
भविष्यातील ऑलिंपिकसह राष्ट्रकुल, आशियाई, विश्वचषक स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त भारतीय खेळाडूंनी पदके जिंकावीत, या उद्देशाने अशा दमदार खेळाडूंची निवड करणे,त्यांचे मूल्यांकन करणे, असे खेळाडू शोधून त्यांना तन्त्रांमार्फत योग्य प्रशिक्षण देणे, आदी कार्ये या समितीमार्फत केली जाणार आहेत. यात २० खेळांचा समावेश असून, यात विविध खेळांतील जागतिक दर्जाचे, अर्जुन पुरस्कारप्राप्त, पद्मश्री, द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त अशा दिग्गज प्रशिक्षक, मार्गदर्शकांचा समावेश आहे. खास कुस्तीसाठी नियुक्त केलेल्या दहा सदस्यांमध्ये पवार यांचाही तज्ज्ञ सदस्य म्हणून समावेश आहे. समितीत या दिग्गजांचाही समावेश आहे.
समितीत जागतिक बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद, ऑलिंपियन नेमबाज गगन नारंग, के. मल्लेश्वरी, राणी रामपाल, द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त महासिंहराव, शोकेंदर, पहिली जागतिक पदक विजेती महिला अलका तोमर, रतन मठपती, महावीर प्रसाद, डॉ. ओ. पी. यादव, प्रियंका सिंह आदी नामांकितांचा 20 खेळामध्ये समावेश आहे.
ऑलिंपिकसह राष्ट्रकुल, आशियाई, जागतिक, विश्वचषक अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त भारतीय खेळाडूंनी पदक विजेती कामगिरी करावी. त्यासाठी टीआयडीसी समिती केंद्र सरकारने स्थापन केली आहे. या समितीवर माझ्यासह विविध खेळांतील नामांकित खेळाडू, प्रशिक्षकांची निवड झाली आहे. माझ्या करिअरमध्ये आई-वडिलांसह डी. ए. सूर्यवंशी, महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर यांचे मार्गदर्शन लाभले असे आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक रामचंद्र पवार यांनी सांगितले.