बेळगाव लाईव्ह:राष्ट्रीय स्तरावर कार्यरत वाॅर वुन्डेड फाउंडेशन या युद्धात अपंगत्व आलेल्या सैनिकांच्या हितासाठी झटणाऱ्या संस्थेतर्फे आज सोमवार दि. 17 व मंगळवार दि. 18 फेब्रुवारी 2025 रोजी युद्धात अपंगत्व आलेल्या सैनिकांच्या राष्ट्रीय पातळीवरील मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती वाॅर वुन्डेड फाउंडेशनचे अध्यक्ष माजी लेफ्टनंट जनरल अचित बी. मितसरी यांनी दिली.
बेळगाव येथील मराठा सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, आमच्या फाउंडेशनतर्फे 17 व 18 फेब्रुवारी 2025 रोजी युद्धात जखमी होऊन अपंगत्व आलेल्या जवानांसाठी रॅलीचे अर्थात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यामध्ये सुमारे 120 दिव्यांग सैनिक सहभागी होणार असून जे एकमेकांशी संवाद साधून विचारांची देवाणघेवाण करतील. या सैनिकांमध्ये कर्नाटक आणि परिसरातील तसेच पूर्व व उत्तर भारतातील दूरवरच्या ठिकाणच्या थोडक्यात देशभरातील युद्धात अपंगत्व आलेल्या सैनिकांचा समावेश असणार आहे आमच्या फाऊंडेशनचे ‘असक्षमतेकडून सक्षमतेकडे वाटचाल’ हे जे ध्येय आहे त्या अनुषंगाने अपंगत्व आलेल्या सैनिकांनी एकमेकांना भेटावे हा या मेळाव्याचा उद्देश आहे.
या अपंग सैनिकांनी फक्त आपले जीवनमान सुधारावयाचे नाही तर देशातील युवा पिढीसाठी आदर्श बनावयाचे आहे, त्यांना प्रोत्साहित करायचे आहे. आम्ही या सैनिकांच्या भावी आयुष्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे मदत करत असतो सर्वप्रथम आम्ही त्यांना नोकरी, व्यवसाय, धंदा यासारखी पर्यायी कारकीर्द उपलब्ध करून देतो. त्यासाठी त्यांना मदत करतो. आमचे बहुतांश सैनिक हे ग्रामीण भागातील असल्यामुळे त्यांना त्यांच्या भागाशी कृषी वगैरे क्षेत्राशी संबंधित उद्योग व्यवसाय सुरू करण्यास किंवा घराजवळ नोकरी मिळवून देण्यास सहाय्यक केले जाते.
गतिशीलतेसाठी त्यांना सुधारित स्कूटर अथवा ऑटोरिक्षा उपलब्ध करून दिली जाते. कोणाच्या मदतीशिवाय नैसर्गिक विधी करता यावेत यासाठी या अपंग सैनिकांकरिता त्याच्या घरात सुधारित शौचालय बांधून दिली जातात. या सैनिकांसाठी आणि त्यांच्या मुलांसाठी कौशल्य विकास उपक्रम राबविले जातात असे सांगून या पद्धतीने विविध मार्गाने आम्ही युद्धात अपंगत्व आलेल्या सैनिकांच्या हिताच्या दृष्टीने कार्य करत आहोत, असे वाॅर वुन्डेड फाउंडेशनचे अध्यक्ष माजी लेफ्टनंट जनरल अचित बी. मितसरी यांनी स्पष्ट केले.
संस्थेबद्दल माहिती देताना माजी लेफ्टनंट जनरल अचित मितसरी यांनी सांगितले की, देश रक्षणार्थ आपल्या सैनिकांनी स्वतःच्या जीव समर्पित करण्याबरोबरच गंभीर जखमी होण्यापर्यंत अगणित बलिदान दिली आहेत. युद्धानंतर त्यामध्ये गंभीर जखमी होऊन अपंगत्व आलेल्या सैनिकांसाठी एक युद्ध संपलेले असते आणि आयुष्यभरासाठी अपंगत्वासह जीवन जगण्याचे युद्ध सुरू झालेले असते.
जखमी होऊन आयुष्यभरासाठी अपंगत्व आलेल्या सैनिकांसाठी भावी जीवन संघर्ष खूप कठीण असतो. हा संघर्ष असा असतो की तो फक्त त्यांना करावा लागत नाही तर त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबालाही करावा लागत असतो. युद्धापासून सुरू झालेला हा संघर्ष त्या सैनिकांना जीवनातील आव्हानांना तोंड देत आयुष्यभर करावा लागतो. त्यामुळे समाजाचे कर्तव्य आहे की त्यांने सैनिकांच्या त्याग बलिदानाचा आदर केला पाहिजे. धडधाकट असताना देशाच्या रक्षणासाठी त्याग बलिदान दिलेल्या अशा विकलांग सैनिकांची त्यांच्या पडत्या काळात काळजी घेणे हे नागरी समाजाचे कर्तव्य असते.
हे लक्षात घेऊन युद्धात जखमी झालेल्या सैनिकांची त्यांच्या उर्वरित आयुष्यात काळजी घेण्याकरिता ‘वाॅर वुन्डेड फाउंडेशन’ या बिगर सरकारी संस्थेची गेल्या 2002 मध्ये स्थापना करण्यात आली. एकेकाळी युद्धात जखमी होऊन आपला पाय गमावलेल्या दोघा मातब्बर ज्येष्ठ सैनिकांनी माजी उपलष्कर प्रमुखांनी एकत्र येऊन या फाउंडेशनची स्थापना केली. ज्यामध्ये भारताचे उपलष्कर प्रमुख मराठा रेजिमेंटचे लेफ्टनंट जनरल विवेक ओबेराॅय यांचा समावेश आहे. ज्यांनी 1965 च्या युद्धामध्ये आपला एक पाय गमावला होता. मात्र तरीही त्यानंतर त्यांनी उपलष्कर प्रमुखाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली. स्थापनेपासून आमचे हे फाउंडेशन युद्धात जखमी होऊन अपंगत्व आलेल्या सैनिकांच्या हितासाठी झटत आहे. लष्कराबाहेर पडलेल्या या सैनिकांसाठी पहिली गोष्ट ही केली जाते की त्यांना पर्यायी भावी कारकीर्द उपलब्ध करून दिली जाते. जी त्यांच्यासाठी सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या उपयुक्त ठरेल. कारण अशा सैनिकांनी मानसिक दृष्ट्या सक्षम राहणे त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी महत्त्वाचं असतं. दुसरी गोष्ट आम्ही संबंधित सैनिकाला आपल्या विकलांगतेवर मात करता यावी यासाठी त्याच्यावर आवश्यक उपचार करणे, दैनंदिनजीवन सुरळीत होण्यासाठी त्याला सुधारित स्कूटर, ऑटो रिक्षा, कृत्रिम पाय, व्हील चेअर वगैरे आवश्यक साधने पुरवतो. त्यांना व त्यांच्या मुलांना अंगभूत कौशल्य विकसित करण्यासाठी प्रोत्साहन देतो.
युद्धात अपंगत्व आलेल्या सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही संशोधन आणि विश्लेषण विभाग ही सुरू केला आहे या विभागाकडून युद्धात अपंगत आलेल्या सैनिकांना भेडसावणाऱ्या समस्याचे निवारण करण्यासाठी आणि त्यांना नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कार्य केले जाते. वाॅर वुन्डेड फाउंडेशन ही संपूर्णपणे बिगर सरकारी संस्था असून जी सरकारकडून कोणतीही मदत घेत नाही. दानशूर व्यक्तींसह कॉर्पोरेट, व्यापार, उद्योग जगताकडून उपलब्ध होणाऱ्या निधीतून हे फाऊंडेशन कार्य करते, असे सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल अचित बी. मितसरी यांनी शेवटी सांगितले.