बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाचा (व्हीटीयू) 24 वा वार्षिक दीक्षांत सोहळा आज विद्यापीठाच्या डॉ. एपीजे अब्दुल कलाम सभागृहात दिमाखात पार पडला.
व्हीटीयू विद्यापीठाच्या उत्कृष्ट शैक्षणिक गुणवत्तेचा उत्सव असणारा हा दीक्षांत सोहळा कर्नाटकचे राज्यपाल आणि व्हीटीयूचे कुलपती थावरचंद गेहलोत यांच्या यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. राज्यपालांनी सोहळ्याचे रीतसर उद्घाटन आणि समारोप केला.
सोहळ्यामध्ये 500 हून अधिक पदव्युत्तर आणि डॉक्टरेट विद्यार्थ्यांना त्यांच्या पदव्या सन्मानाने प्रदान करण्यात आल्या. आपल्या प्रेरणादायी अध्यक्षीय भाषणात राज्यपाल गेहलोत यांनी सुवर्ण पदक विजेत्या गुणवंतांमध्ये विद्यार्थिनींची संख्या लक्षणीय असल्याबद्दल प्रचंड आनंद व्यक्त केला.
सुवर्ण पदक विजेत्या महिलांच्या संख्येने त्यांच्या पुरुष समकक्षांना मागे टाकले आहे या वस्तुस्थितीवर प्रकाश टाकून महिलांच्या सक्रिय योगदान आणि सक्षमीकरणामध्ये आमच्या राष्ट्राची प्रगती खोलवर रुजलेली आहे, असे त्यांनी सांगितले.
दीक्षांत सोहळ्याच्या प्रमुख पाहुण्या एनआयसीएचई युनिव्हर्सिटी कन्याकुमारी, तामिळनाडूच्या कुलगुरू आणि प्रतिष्ठित शास्त्रज्ञ तसेच एरोनॉटिकल सिस्टीमच्या माजी महासंचालक आणि डीआरडीओ, संरक्षण मंत्रालय, भारत सरकारच्या अग्नी -4 व अग्नी -5 क्षेपणास्त्रांच्या माजी प्रकल्प संचालक भारताची ‘मिसाईल वुमन’ किंवा ‘अग्नी पुत्री’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. टेसी थॉमस यांनी आपल्या समायोचीत भाषणात दीक्षांत सोहळ्यात सहभागी होण्याचा सन्मान दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
अंतराळ आणि संरक्षण तंत्रज्ञानातील भारताच्या प्रगतीबद्दल अभिमान व्यक्त करताना त्यांनी भारत आता या क्षेत्रात नाविन्यपूर्ण आणि जागतिक नेतृत्वात आघाडीवर असल्याचे स्पष्ट केले. आजच्या दीक्षांत सोहळ्यात एम.टेक, एम.प्लॅन, एम.आर्क, एम.बी.ए. आणि एम.सी.ए. यांसारख्या विषयांतील पदव्युत्तर विद्यार्थ्यांना एकूण 20 सुवर्णपदके प्रदान करण्यात आली. याव्यतिरिक्त 500 हून अधिक विद्वानांना त्यांच्या संशोधनातील अनुकरणीय योगदानाबद्दल पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली.
उपकुलगुरू प्रा. विद्याशंकर एस., डीन डॉ. सदाशिव गौडा, निबंधक अर्थात कुलसचिव डॉ. बी. ई. रंगास्वामी आणि कुलसचिव (मूल्यांकन) डॉ. टी. एन. श्रीनिवास यांच्या हस्ते या पदव्यांचे वितरण करण्यात आले. पदवीदान समारंभानंतर डॉ. टेसी थॉमस यांचा विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दीक्षांत समारंभाच्या अगोदर व्हीटीयू विद्यापीठाच्या शैक्षणिक ब्लॉक-5 मधील विद्या भवनचे उद्घाटन करण्यात आले.
कुलपती राज्यपाल थावरचंद आणि प्रमुख पाहुण्या डॉ. टेसी थॉमस यांच्या हस्ते हा उद्घाटन समारंभ पार पडला. यावेळी उपकुलगुरू प्रा. विद्याशंकर एस. आणि व्हीटीयूचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शैक्षणिक ब्लॉक-5 मधील ‘विद्या भवन’ हे व्हीटीयूच्या विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सुविधा पुरवण्याच्या वचनबद्धतेचा दाखला आहे.