बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहर पोलीस आयुक्तालय अखत्यारीत ‘प्रोजेक्ट हेल्मेट अभियान’ तीव्र करण्यात आले असून आज खुद्द पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांवर कारवाई करण्याबरोबरच त्यांच्या हाती फलक देऊन मोहिमे बाबत जागृती करण्यात आली.
दुचाकी अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे यासाठी बेळगाव शहर रहदारी पोलिसांकडून दुचाकी वरील हेल्मेट वापराच्या अनिवार्यतेबद्दल जनजागृती केली जात आहे. यासाठी शहरातील प्रमुख चौक आणि मार्गांवर विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांवर कारवाई करत दंड वसुली करण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे विनाहेल्मेट दुचाकी चालकांच्या हातात जनजागृतीचे फलक देऊन शिक्षा म्हणून त्यांना हेल्मेट बाबत जागृतीच्या घोषणा देण्यास भाग पाडले जात आहे. त्यानुसार प्रोजेक्ट हेल्मेट अंतर्गत आज शुक्रवारी देखील बेळगाव शहर व उपनगरात हेल्मेट बाबत जागृती मोहीम राबविण्यात आली.
शहरातील मुख्य चौकांपैकी एक असलेल्या राणी चन्नम्मा सर्कल येथे आज सकाळी राबवण्यात आलेल्या या मोहिमेप्रसंगी खुद्द शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग उपस्थित होते. यावेळी विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या दुचाकीस्वारांना अडवून त्यांच्या हातात ‘हेल्मेट परिधान करा जीव वाचवा’ या आशयाचे फलक देऊन जनजागृती करण्यात आली.
पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग यांनी हेल्मेट संदर्भातील कारवाई बाबत माहिती देताना मार्च अखेर बेळगाव शहर आणि उपनगर भागात किमान 90 टक्के हेल्मेट सक्ती केली जाणार असल्याचे स्पष्ट केले. सरकारी कार्यालयातही याबाबत जागृती हाती घेण्यात आली आहे.
येत्या 11 फेब्रुवारीपर्यंत सर्व सरकारी कार्यालयात हेल्मेटबाबत जागृती केली जाईल असे सांगताना ‘प्रोजेक्ट हेल्मेट अभियान’ अंतर्गत सहा पोलीस अधिकाऱ्यांवर विनाहेल्मेट प्रकरणी कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलीस आयुक्त मार्बन्यांग यांनी दिली.