बेळगाव लाईव्ह : जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी परीक्षा वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. पहिली ते नववीच्या परीक्षा मार्च महिन्यात संपतील. तर बारावी 1 मार्चपासून आणि दहावी परीक्षा 21 मार्चपासून सुरू होणार आहे.
शालेय शिक्षण विभागाने पहिली ते नववीच्या परीक्षा वेळापत्रकाची घोषणा केली असून, विद्यार्थ्यांनी तयारीला सुरुवात केली आहे. पहिली ते सातवीच्या परीक्षा 18 मार्चपासून सुरू होणार असून, आठवी व नववीच्या परीक्षा 5 मार्चपासून घेण्यात येणार आहेत.
या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अंतिम टप्प्यातील मार्गदर्शन सुरू झाले आहे. दरम्यान, बारावीच्या परीक्षा 1 मार्चपासून आणि दहावीच्या परीक्षा 21 मार्चपासून होणार आहेत. याच दरम्यान शालांत परीक्षा देखील घेतल्या जातील.
दहावीच्या परीक्षेसाठी शिक्षकांना पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे आठवी व नववीच्या परीक्षा दहावीपूर्वीच पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रत्येक वर्गासाठी परीक्षा तारखा निश्चित करण्यात आल्या असून, पहिली ते पाचवीच्या परीक्षा 18 मार्चपासून तर सहावी-सातवीच्या परीक्षा 18 मार्च ते 25 मार्चदरम्यान पार पडतील. आठवी व नववीच्या परीक्षा 5 मार्चपासून 12 मार्चदरम्यान घेण्यात येतील. मार्च अखेरपर्यंत सर्व शालेय परीक्षा पूर्ण होतील, अशी माहिती जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयाने दिली आहे.
पहिली ते पाचवी वर्गांसाठी दि. 18 मार्च रोजी प्रथम भाषा, 19 रोजी द्वितीय भाषा, 20 रोजी गणित, 21 रोजी पर्यावरण शिक्षण, 22 रोजी शारीरिक शिक्षण पेपर होणार आहे. सहावी व सातवी वर्गांसाठी 18 रोजी शारीरिक शिक्षण व कला, 19 रोजी प्रथम भाषा, 20 रोजी द्वितीय भाषा, 21 रोजी तृतीय भाषा, 22 रोजी गणित, 24 रोजी विज्ञान,
25 रोजी समाज विज्ञान या विषयाचा पेपर होईल. आठवी व नववीसाठी 5 मार्च रोजी शारीरिक शिक्षण, चित्रकला, 6 रोजी प्रथम भाषा, 7 रोजी द्वितीय भाषा, 8 रोजी तृतीय भाषा, 10 रोजी गणित, 11 रोजी विज्ञान, 12 रोजी समाज विज्ञान विषयाची परीक्षा घेतली जाणार असल्याचे वेळापत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.