बेळगाव लाईव्ह : तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आयोजित चंदगड मतदार संघाचे आमदार शिवाजी पाटील यांचा सत्कार कार्यक्रम रद्द करू पाहणाऱ्यांची खरडपट्टी मध्यवर्ती समितीच्या वतीने काढण्यात आली.
समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी युवा आघाडीचा हा कार्यक्रम होऊ नये, यासाठी प्रयत्न करणार्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. सीमालढ्यातील प्रत्येक कार्यक्रम मराठी भाषिकांसाठी असतो. पण, तो बंद पाडण्याचा प्रयत्न केला तर मराठी माणसांशी प्रतारणा होईल. सामान्य माणसांवर हा लढा सुरू आहे. त्यामुळे कोणीही लढ्यापेक्षा मोठा समजू नये. ज्यांनी कोणी हा प्रयत्न केला आहे, त्यांची नावे माझ्याकडे आहेत. योग्य वेळ आली की त्यांची नावे मी जाहीर करेन, त्यावेळी जनतेने त्यांचे काय करायचे ठरवावे अश्या शब्दात मरगाळे यांनी खरडपट्टी काढली.
सीमा प्रश्नांच्या आंदोलनाची रूपरेषा या कार्यक्रमात ठरवण्यात आली.बाईक रॅली नाही, थेट मुंबईला धडकणार असल्याचे त्यांनी म्हटले.सीमाप्रश्नी शिवसेनेचे कोल्हापूर येथे नेते विजय देवणे यांनी महाराष्ट्रात सर्वपक्षीय आंदोलन उभे करण्यासाठी पुढाकार घेण्यात येईल, असे सांगितले आहे. त्यामुळे बाईक रॅली नव्हे तर वाहनांतून मुंबईत अधिवेशन काळात लढा उभारण्यात येईल
हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक आवारात रविवारी युवा आघाडीच्या वतीने चंदगडचे नूतन आमदार शिवाजी पाटील यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. समिती अध्यक्ष, माजी आमदार मनोहर किणेकर अध्यक्षस्थानी होते.
यावेळी किणेकर म्हणाले, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी आम्ही सर्वपक्षीय नेत्यांना सीमाप्रश्नाचा उल्लेख जाहीरनाम्यात करावा, अशी विनंती केली होती. पण, दुर्दैवाने तसा कोणीही उल्लेख केला नाही. पण, शिवाजी पाटील यांनी सीमाप्रश्नाचा उल्लेख आपल्या जाहीरनाम्यात केला. आमदारकीची शपथ घेताना सीमावासियांचे स्मरण केले. त्यामुळे त्यांच्या सत्काराचे आयोजन केले होते. त्यासाठी त्यांना भेटून तारिख ठरवण्यात आली होती. पण, उद्यापासून सुरू होणार्या प्रशिक्षणासाठी आजच त्यांना दिल्लीला जावे लागले. त्यामुळे ते त्यांच्याच सत्कार कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. पण, तसा निरोप आम्हाला त्यांच्याकडून किंवा त्यांच्या माणसांकडून मिळाला नाही. आम्ही सीमाप्रश्नी यापुढील लढा महाराष्ट्रात करण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार गेल्या महिन्यात कोल्हापूर येथे आंदोलन झाले. पुढील काळात सांगली, सातारा, पुणे आणि 1 मे रोजी मुंबईत होणार आहे. बेळगाव आणि चंदगड एकाच प्रांतातील दोन तालुके असल्यामुळे जवळीक अधिक आहे.
त्यामुळे चंदगडच्या आमदारांनी आमचे मागणे महाराष्ट्राच्या विधानसभेत मांडावे, अशी आमची अपेक्षा हा सत्कार करण्यामागे आहे. याबाबत त्यांच्या प्रतिनिधींनी निरोप त्यांना द्यावा.यावेळी आमदार शिवाजी पाटील यांच्या अनुपस्थितीत चंदगड पंचायत समितीचे माजी अध्यक्ष यशवंत सोनार यांनी सत्कार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी सीमाप्रश्नी आमदार पाटील आग्रही असून त्यांच्या पुढाकारानेच हा प्रश्न सुटेल, असे सांगितले. यावेळी युवा आघाडी सचिव शंकर कोनेरी यांनी सत्काराबाबत भुमिका स्पष्ट केली. कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले. अॅड. एम. जी. पाटील यांनी आभार मानले. व्यासपीठावर युवा आघाडी अध्यक्ष राजू किणयेकर होते.