Friday, February 7, 2025

/

हिडकलच्या पाण्याऐवजी सुचवण्यात आलेत ‘हे’ पर्याय

 belgaum

बेळगाव लाईव्ह :हिडकल जलाशयाचे पाणी हुबळी -धारवाड औद्योगिक वसाहतीला पुरवल्यास बेळगाव शहरासह जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या अकाली पाणी टंचाईची समस्या लक्षात घेऊन हिडकलच्या पाण्याऐवजी सरकार प्रशासनाने हालगा गावाजवळील बेळगाव महापालिकेच्या सांडपाणी प्रकल्पाचे पाणी, अथवा गदग जवळील बेन्नीहाळ येथे मोठ्या प्रमाणात साचणारे पावसाचे पाणी चेकडॅम बांधून नरगुंद, नवलगुंद मार्गे हुबळी -धारवाड औद्योगिक वसाहतीला पुरवण्यात यावे, असा सल्ला बेळगाव भ्रष्टाचार निर्मूलन परिवारचे संस्थापक अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद यांनी दिला आहे.

हिडकल जलाशयाचे पाणी खास जलवाहिनीद्वारे हुबळी धारवाड औद्योगिक वसाहतीला पुरवण्याच्या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात विरोध दर्शविला जात आहे. या पार्श्वभूमीवर वैयक्तिक व्हिडिओच्या माध्यमातून आपले मत व्यक्त करताना सामाजिक कार्यकर्ते मुळगुंद  आणि राजू टोपननवर यांनी हुबळी धारवाड औद्योगिक वसाहतीला पाणी पुरवण्याचे उपरोक्त पर्याय सुचवले.

ते म्हणाले की, राज्य सरकारने सांडपाणी प्रकल्पांसाठी मंजूर केलेल्या 167 कोटी रुपयांपैकी 101 कोटी रुपये खर्चून बेळगाव महापालिका हद्दीत हालगा गावाजवळ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आला आहे. आता आणखी 20 कोटी रुपये खर्च करून संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली तर हा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. पाणी पुरवठा मंडळाच्या नियमानुसार कोणतेही प्रक्रिया केलेले पाणी औद्योगिक कामासाठी चालू शकते. त्यामुळे महापालिकेच्या सांडपाणी प्रकल्पाचे प्रक्रिया झालेले पाणी हुबळी -धारवाड औद्योगिक वसाहतीला पुरवण्यात यावे. त्यामुळे बेळगाव महापालिकेला देखील चांगला महसूल मिळवून पालिकेची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल.

हिडकल जलाशयाचे पाणी भुयारी जलवाहिन्या मार्फत हुबळी -धारवाड औद्योगिक वसाहतीला पुरवण्यास आम्ही तीव्र विरोध केला आहे. कारण तसे झाल्यास बेळगाव शहर व तालुक्यासह चिक्कोडी, रायबाग, हुक्केरी, कुडची, अरेभावी, गोकाक, मुडलगी, हारूगिरी, महालिंगपूर, बनहट्टी, मुधोळ अशा बागलकोट पर्यंतच्या अनेक गावांना हिडकलच्या डाव्या व उजव्या कालव्यातून होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर प्रतिकूल परिणाम होणार आहे.

सध्या सदर पाणी पुरवठा होत असताना देखील संबंधित भागांमध्ये एप्रिल -मे महिन्यात पाणी टंचाई उद्भवत असते. ही टंचाई जानेवारी फेब्रुवारी महिन्यातच निर्माण होऊन अधिक गंभीर परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी हिडकलच्या पाण्याला अन्य कोणत्याही कारणासाठी हात लावला जाऊ नये. ज्यामुळे या भागातील मनुष्य व पशुपक्ष्यांचे हाल होणार नाहीत आणि उद्योगधंदे देखील सुरळीत राहतील.Raju top

हुबळी -धारवाड औद्योगिक वसाहतीसाठी बेळगाव येथील सांडपाणी प्रकल्पाच्या पाण्याव्यतिरिक्त आम्ही दुसरा एक पर्याय सुचवला आहे. तो म्हणजे गदग जवळील बेन्नीहाळ येथे मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचून मोठा तलाव निर्माण झाला आहे. त्या ठिकाणचा गाळ काढून व चेकडॅम बांधून तेथील पाणी नरगुंद, नवलगुंद मार्गे हुबळी -धारवाड औद्योगिक वसाहतीला पुरवण्यात यावे. तेंव्हा या दोन्ही पर्यायांचा राज्याचे औद्योगिक मंत्री एम. बी. पाटील तसेच उपमुख्यमंत्री व पाटबंधारे मंत्री डी. के. शिवकुमार यांनी गांभीर्याने विचार करावा अशी माझी विनंती आहे.

कारण यामुळे हुबळी -धारवाड औद्योगिक वसाहतीची पाण्याची गरज पूर्ण होण्याबरोबरच बेळगाव जिल्ह्यासाठी असणाऱ्या पिण्याच्या पाण्याची बचत होईल, असे सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.