बेळगाव लाईव्ह : दावणगेरे जिल्ह्यातील चेन्नगिरी येथे हिंदू विद्यार्थिनींवर आणि महिलांवर बलात्कार करून त्याचे व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या नराधमास कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी श्रीराम सेनेने केली आहे. यासंदर्भात बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत गृह मंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि,दावणगेरे जिल्ह्यातील चेन्नगिरी येथे एका मेडिकल दुकानात जाणाऱ्या हिंदू विद्यार्थिनींना आणि महिलांना फसवून, त्यांना भूल देऊन त्यांच्यावर बलात्कार करून त्याचे व्हिडिओ प्रसारित केल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकारावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत श्रीराम सेनेच्या बेळगाव शाखेने आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
या पार्श्वभूमीवर श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत गृह मंत्र्यांना निवेदन दिले आहे. यावेळी श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष रवीकुमार कोकितकर यांनी सांगितले की, अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलली पाहिजेत. आरोपीला तातडीने अटक करून कठोर शिक्षा देण्यात यावी, तसेच पीडित महिलांना न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी केली.
राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये ‘लव्ह जिहाद’, वेश्याव्यवसाय आणि मानव तस्करीचे प्रकार वाढत असल्याने त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष महिला पोलिसांची नियुक्ती करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. या आंदोलनात श्रीराम सेनेचे विनय अंग्रोळी, विठ्ठल गड्डी यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.