बेळगाव लाईव्ह :रस्त्याच्या दुरुस्तीच्या कारणास्तव तिलारी घाटातील रस्ता पूर्णतः बंद ठेवण्यात आल्यानंतर आता हेमाडगा -गोवा हा रस्ता रुमेवाडी क्रॉस खानापूर येथे बंद करण्यात आला आहे.
मंतुर्गा रेल्वे फाटकाजवळ अंडरपास रस्त्याचे बांधकाम सुरू असल्यामुळे हेमाडगा मार्गे गोव्याला जाणारा रस्ता रुमेवाडी क्रॉस खानापूर येथे बंद करण्यात आला असल्याचे बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले असून प्रवाशांनी याची नोंद घेण्याचे आवाहन केले आहे.
पावसाळ्यात तिलारी घाटातील रस्ता खचल्याने त्याच्या दुरुस्तीचे काम गेल्या सोमवारपासून हाती घेण्यात आले आहे. परिणामी तिलारी घाटातून जाणारी चारचाकी, दुचाकीसह सर्वच वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात आली आहे.
त्यापाठोपाठ आता हेमाडगा -गोवा हा रस्ता बंद करण्यात आल्यामुळे महाराष्ट्रातील बेळगाव मार्गे गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांना तसेच बेळगाव, खानापूर, हुबळी, धारवाडच्या प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.