बेळगाव लाईव्ह : दीड वर्षांपासून सर्व्हर डाऊनच्या समस्येमुळे तसेच हमी योजनेच्या अंमलबजावणीनंतर रखडलेली रेशनकार्ड दुरुस्ती प्रक्रिया अखेर वेग घेत आहे. गेल्या दीड वर्षांपासून रखडलेली ही प्रक्रिया नववर्षाच्या सुरुवातीपासून सुरू झाली होती.
मात्र, अर्जदारांची वाढती संख्या लक्षात घेता मुदत आता ३१ जानेवारीऐवजी २८ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आलीरे आहे. त्यामुळे, अनेक लाभार्थ्यांना आवश्यक दुरुस्ती करण्याची संधी मिळणार आहे.
विविध सेवांसाठी आवश्यक असलेल्या या दुरुस्तीला सुरुवात झाल्यानंतर अर्जांची संख्या वाढली. रेशनकार्ड दुरुस्ती अंतर्गत नाव कमी करणे, नवीन नाव घालणे, पत्ता बदल, मोबाईल नंबर अद्ययावत करणे यांसारख्या सेवा उपलब्ध आहेत.
मात्र, या प्रक्रियेसाठी उत्पन्नाचा दाखला अनिवार्य असल्याने नागरिकांना त्यासाठी अडचणी येत आहेत. जात-उत्पन्न दाखल्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची धावपळ सुरू झाली आहे.
बेळगाव वन आणि ग्राम वनमध्ये रेशनकार्ड दुरुस्तीचे काम सुरळीत सुरू असले तरी अन्य ठिकाणी ही सेवा अद्याप उपलब्ध नाही. यामुळे लाभार्थ्यांची गैरसोय होत असून, सर्व ठिकाणी दुरुस्ती प्रक्रिया सुरू ठेवण्याची मागणी होत आहे. दरम्यान, सरकारी कर्मचाऱ्यांकडे बीपीएल रेशनकार्ड असल्यास ते तातडीने संबंधित खात्यात जमा करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अनेक सरकारी कर्मचारी शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी बीपीएल रेशनकार्ड वापरत असल्याचे आढळून आल्याने त्यांच्याकडून कार्डे जमा करण्यासाठी प्रशासनाने आवाहन केले आहे. रेशनकार्ड दुरुस्ती प्रक्रियेत गती आणण्यासाठी आणि अर्जदारांची गैरसोय टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनाने अधिक प्रयत्न करावेत, अशी नागरिकांची मागणी आहे.