बेळगाव लाईव्ह :बुडीत निघालेल्या बेळगाव येथील श्री संगोळ्ळी रायण्णा अर्बन को-ऑपरेटिव्ह व सौहार्द सहकारी सोसायटीतील आपल्या ठेवी परत मिळाव्यात यासाठी केलेले अर्ज सक्षम प्राधिकरण (केपीआयडी) तथा विशेष अधिकाऱ्यांकडून फेटाळण्यात आल्याच्या निषेधार्थ, तसेच ठेवी तात्काळ परत मिळाव्यात या मागणीसाठी सदर सोसायटीच्या त्रस्त, संतप्त ठेवीदारांनी येत्या सोमवार दि. 3 मार्च 2025 रोजी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून तशा आशयाचे निवेदन आज त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.
बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय आवारात मोठ्या संख्येने जमलेल्या श्री संगोळी रायण्णा सोसायटीच्या ठेवीदारांनी आज बुधवारी सकाळी ॲड. विक्रमसिंह राजपूत यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.
तसेच आमच्या ठेवी आम्हाला सुरक्षित परत मिळाव्यात यासाठी सरकारने येत्या 3 मार्चपूर्वी योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी केली. याप्रसंगी बेळगाव लाईव्हशी बोलताना ॲड. राजपूत यांनी सांगितले की, श्री संगोळी रायण्णा सोसायटीच्या घोटाळ्याप्रकरणी ठेवीदारांना अर्ज दाखल करण्याचे आवाहन गेल्या नोव्हेंबर 2023 मध्ये करण्यात आले होते. त्यानुसार बेंगलोर येथे जाऊन ठेवीदाराने अर्ज दाखल केले होते.
जवळपास महिनाभर चाललेल्या या प्रक्रिये वेळी अर्जासोबत ठेवीदारांनी पुराव्या दाखल आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता केली होती. अर्ज स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्यांनी देखील सर्व कागदपत्रे व्यवस्थित असल्याचे सांगून पाच -सहा महिन्यात ठेवीचे पैसे तुम्हाला परत मिळतील अशी ग्वाही दिली होती. मात्र आता अचानक आपल्या ठेवी परत मिळाव्यात यासाठी ठेवीदारांनी दाखल केलेले अर्ज सक्षम प्राधिकरण (केपीआयडी) तथा विशेष अधिकाऱ्यांकडून अपुऱ्या पुराव्याचे कारण देऊन फेटाळण्यात आले आहेत.
या प्रकारामुळे ठेवीदारांमध्ये प्रचंड चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
श्री संगोळी रायण्णा सोसायटीचे सुमारे 5000 ठेवीदार असून मी स्वतः देखील त्यापैकी एक आहे. आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता केली असताना या पद्धतीने ठेवीदारांचे अर्ज नाकारणे हा त्यांच्यावर अन्याय आहे. सरकारने आमच्यावरील हा अन्याय दूर करावा आणि त्यासाठी त्वरेने कार्यवाही करावी.
अन्यथा येत्या 3 मार्च रोजी सर्व ठेवीदारांकडून मोठे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आम्ही दिला आहे, अशी माहिती ॲड. विक्रमसिंह राजपूत यांनी दिली. आज सादर करण्यात आलेल्या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री सिद्धरामय्या, खासदार जगदीश शेट्टर, खासदार प्रियांका जारकीहोळी, सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, शहर पोलीस आयुक्त आणि सक्षम प्राधिकरण तथा विशेष अधिकाऱ्यांना धाडण्यात आल्या आहेत.