बेळगाव लाईव्ह :हिडकल जलाशयातून हुबळी -धारवाड औद्योगिक वसाहतीला पाणी पुरवठा त्याला जाऊ नये आणि त्यासाठी हाती घेण्यात आलेले जलवाहिनी घालण्याचे काम तात्काळ थांबवावे, या मागणीसाठी येत्या दि. 5 मार्च 2025 रोजी बेळगाव शहरातील संघ -संस्था, संघटना आणि समस्त नागरिकांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून पुन्हा एकदा जोरदार आवाज उठवण्याचा निर्णय ‘आमचे पाणी, आमचा हक्क’ समितीने बोलाविलेल्या बैठकीत एकमताने घेण्यात आला.
शहरातील कन्नड साहित्य भवन येथे आज मंगळवारी सकाळी ‘आमचे पाणी, आमचा हक्क’ समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. हिडकल जलाशयातून हुबळी -धारवाड औद्योगिक वसाहतीला पाणी पुरवठा करण्यास बेळगाव शहरासह जिल्ह्यातून विरोध असतानाही सदर योजनेचे काम सुरूच असल्याबद्दल बैठकीत चर्चा करून मते अजमावण्यात आली.
यावेळी माजी आमदार रमेश कुडची, रणजीत चव्हाण -पाटील, माजी महापौर शिवाजी सुंठकर, शेतकरी नेते राजू मरवे,रमाकांत कोंडुसकर आदींनी आपले विचार व्यक्त करताना हुबळी -धारवाड औद्योगिक वसाहतीला हिडकलचे पाणी देण्याच्या विरोधातील लढा अधिक तीव्र करण्याची गरज व्यक्त केली. सदर योजनेला आळा घातला नाही तर येत्या काळात पाणी टंचाईच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे या योजनेविरुद्धच्या लढ्यात शहरासह जिल्ह्यातील समस्त संघ-संस्था, संघटनांसह प्रत्येक नागरिकांनी सहभागी झाले पाहिजे, असे यावेळी नमूद करण्यात आले. बैठकीस विविध संघटनांचे पदाधिकारी, सदस्य आणि नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद यांनी बैठकीनंतर बेळगाव लाईव्हशी बोलताना आजच्या बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. हुबळी -धारवाड औद्योगिक वसाहतीला हिडकलचे पाणी देण्याच्या विरोधातील लढ्यासाठी फक्त आमचे पाणी, आमचा हक्क समितीच्या पदाधिकारी व सदस्यांनी झटून उपयोग नाही. आपल्याला व आपल्या भावी पिढीला पाण्याची कमतरता भासू नये असे वाटत असेल तर समस्त जनतेने या लढ्यात सहभागी झाले पाहिजे. आमचे पाणी, आमचा हक्क समितीच्या कोर कमिटीने नुकतीच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन सध्या फेब्रुवारी महिन्यातच शहर परिसरात निर्माण होत असलेली पाणीटंचाई त्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे अशा परिस्थितीत जर हुबळी धारवाडला हिडकलचे पाणी दिल्यास शहरातील पाण्याची गंभीर समस्या उद्भव होऊन मनुष्यसह पशु पक्षांनाही पाणी उपलब्ध होणार नाही असे आम्ही त्यांना सांगितले
. त्यावर त्या योजनेचे काम बंद करून तीन तहसीलदारांकडून त्या योजनेसंदर्भातील अहवाल मागवला आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. काम पूर्णपणे बंद झालेले नसून काही ठिकाणी ते सुरू असल्याचे आम्ही त्यांच्या कानावर घातले. तसेच येत्या 5 मार्च 2025 पर्यंत सदर योजनेचे काम संपूर्णपणे बंद झाले नाही तर शहरातील धर्मवीर संभाजी महाराज चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा आम्ही त्यांना दिला. त्यावर येत्या आठवड्याभरात संबंधित अधिकारी आणि मंत्री महोदयांशी चर्चा करून आपण योग्य तो निर्णय घेऊ ज्यामुळे तुमच्यावर आंदोलन करण्याची वेळच येणार नाही, असे आश्वासन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आम्हाला दिले आहे, असे मुळगुंद यांनी सांगितले.
आता ‘आमचे पाणी, आमचा हक्क’ या आंदोलनात समस्त बेळगावकरांनी सहभागी होण्याची वेळ आली आहे. हिडकलच्या पाण्यासाठी लढा देण्याकरिता सर्वांनी सज्ज राहिला पाहिजे असे आवाहन करून आज बेळगाव जिल्ह्यामध्ये 18 आमदार, दोन खासदार आणि दोन मंत्री आहेत. मात्र यापैकी जिल्हा पालकमंत्री, बेळगाव उत्तरचे आमदार आणि बेळगावचे खासदार अशा फक्त तिघा जणांनी हिडकलचे पाणी हुबळी -धारवाड औद्योगिक वसाहतीला पुरवण्यास जाहीर विरोध केला आहे.
तथापि उर्वरित सर्वजण तसेच महापालिकेतील सत्ताधारी व विरोधी गटाचे नगरसेवक अद्याप एक अवाक्षरही उच्चारण्यास तयार नाहीत. बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स, बेळगाव स्मॉल स्केल इंडस्ट्रीज सारख्या संघटना देखील आवाज उठवण्यास तयार नाहीत ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे, असे सुजित मुळगुंद शेवटी म्हणाले.