बेळगाव लाईव्ह : बेळगावात ऑटोचालकांच्या उद्धट वागणुकीचे प्रकार वाढत असून, ओल्ड पीबी रोडवर एका तरुणावर हल्ला करण्यात आला.
विशेष म्हणजे, हा प्रकार त्या तरुणाच्या वडिलांसमोर घडला असून, त्यांच्यासोबतही ढकलाढकली करण्यात आली. या घटनेमुळे संतप्त नागरिकांनी जोरदार प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून, घटनास्थळी मोठ्या संख्येने जमाव गोळा झाला.
बेळगाव शहरात ऑटोचालकांचा मनमानी कारभार सुरूच असून, ओल्ड पीबी रोडवर झालेल्या घटनेने हे पुन्हा स्पष्ट झाले आहे. वयोवृद्ध वडिलांसमोरच ऑटोचालकाने तरुणावर हल्ला केला आणि त्यांच्या वडिलांनाही न जुमानता मारहाण केली.
यामुळे परिसरातील नागरिक आक्रमक झाले आणि आरोपी ऑटोचालकाला धारेवर धरले. जमाव वाढत असल्याचे लक्षात येताच संबंधित चालक ऑटो सोडून फरार झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, आरोपी चालकाचा शोध सुरू आहे. ही घटना मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, पोलिसांकडून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.