राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ नजीक पेट्रोलवाहु टँकर पलटी : सुदैवाने टळला अपघात

0
17
Soudha
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव-बैलहोंगल मार्गावरील भरतेश स्कूलजवळ पेट्रोल वाहू टँकर पलटून मोठ्या प्रमाणात पेट्रोल रस्त्यावर सांडले. पेट्रोलने भरलेला टँकर महामार्गावर पलटी झाल्याने हजारो लिटर पेट्रोल रस्त्यावर सांडले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, संभाव्य दुर्घटनेला आळा घालण्यासाठी पोलिस आणि अग्निशामक दलाने तत्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

पेट्रोल टँकर क्रमांक KA-23 A 8171 हा देसुर डेपो येथून बैलहोंगलच्या दिशेने गुळेन्नावर पेट्रोल पंपाकडे निघाला होता. टँकर हलगा-बैलहोंगल महामार्गावर भरतेश स्कूलजवळ पोहोचताच चालकाचे नियंत्रण सुटले आणि तो महामार्गाच्या दुभाजकानजीक पलटी झाला. अपघातामुळे हजारो लिटर पेट्रोल रस्त्यावर सांडले. घटनेची माहिती मिळताच हिरेबागेवाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक गोणी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. संभाव्य धोका लक्षात घेऊन अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी केमिकल मिश्रित पाणी फवारून पेट्रोलमुळे आग भडकेल अशी परिस्थिती टाळली.

दरम्यान, अपघातस्थळी स्थानिक नागरिकांची गर्दी झाली. काही जण पेट्रोल गोळा करण्यासाठी झुंबड घालू लागले. हे पाहताच पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आणि मोठा अनर्थ टळला. प्राथमिक तपासात टँकर चालक नशेत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांनी या दिशेने कारवाई सुरू केली आहे. वाहतूक नियंत्रित करण्यासाठी क्रेनची व्यवस्था करण्यात आली होती. महामार्गावरील रहदारी मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती. त्यामुळे वाहतूक सर्व्हिस रोडवर वळवण्यात आली. हिरेबागेवाडी पोलिसांनी वेळीच प्रसंगावधान राखून वाहतूक सुरळीत करण्यासाठी विशेष नियोजन केले. दरम्यान पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलीस आणि अग्निशमक दलाने राबवलेल्या मोहिमेचे कौतुक केले आणि घटनेची एकूण माहिती जाणून घेतली.Soudha

 belgaum

याबाबत अधिक माहिती देताना अग्निशामक दलाचे अधिकारी शशिधर नीलगार म्हणाले, सदर टँकर पलटी झाल्याबाबत आम्हाला माहिती मिळाली. तातडीने अग्निशामक दल अपघातस्थळी दाखल झाले. मात्र तत्पूर्वी टँकरमधील पेट्रोल मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर सांडत होते. टँकरमधून सांडणारे पेट्रोल भरून घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मात्र नागरिकांचा असा उतावीळपणा हा धोकादायक ठरू शकतो. पेट्रोल अत्यंत ज्वलनशील पदार्थ असल्याने संपूर्ण टँकरचाही स्फोट होऊ शकतो. अशावेळी नागरिकांनी उतावळेपणा न करता जागरूकता आणि सावधानता बाळगणे गरजेचे आहे.

बेळगावमध्ये अनेक ठिकाणी आगीच्या घटना घडत आहेत. अशा घटना घडल्यानंतर नागरिकांनी तातडीने अग्निशामक दलाला पाचारण करावे, परंतु तत्पूर्वी आग विझविण्यासाठी प्राथमिक स्वरूपात आपणही प्रयत्न करावेत. अग्निशामक दलाला पाचारण करण्यासाठी ०८३१-२४२९४४१ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.