बेळगाव लाईव्ह :चित्रदुर्ग येथे कन्नड रक्षण वेदिकेच्या गुंडांनी महाराष्ट्र एसटी बसला आणि बस चालकाला काळे फासल्याच्या घटनेची पडसाद महाराष्ट्रात उमटण्याची शक्यता लक्षात घेऊन कर्नाटकातून महाराष्ट्राकडे जाणारी बस सेवा थांबवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आज शनिवारी सकाळपासून महाराष्ट्रातून एकही बस बेळगावकडे आलेली नाही.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बेंगलोर होऊन मुंबईकडे प्रवास करणाऱ्या एसटी बसला अडवून कन्नड रक्षण वेदिकेच्या गुंडांनी कन्नड येत नसल्याच्या कारणास्तव बस चालक आणि बसला काळे फासण्याचा प्रकार केला.
त्यामुळे महाराष्ट्रातील एसटी कर्मचारी आक्रमक झाले असून सुरक्षा मिळाल्याखेरीज कर्नाटकात गाड्या घेऊन जाण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला आहे. या खेरीज चित्रदुर्ग येथील घटनेमुळे कोल्हापूरसह बेळगाव सीमाभागातही संतापाची लाट उसळली आहे.
या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून बेळगाव भागातून महाराष्ट्राकडे जाणाऱ्या कर्नाटक परिवहन मंडळाच्या बस सेवा थांबविण्यात आल्या आहेत. बेळगाव मधून कर्नाटक हद्दीतील फक्त निपाणी पर्यंतच धिम्या गतीने बस सेवा सुरू आहे.
दुसरीकडे महाराष्ट्र एसटीच्या कर्मचाऱ्यांनी सुरक्षेची हमी मिळाल्याखेरीज कर्नाटक हद्दीत जाण्यास नकार दिला असल्यामुळे आज शनिवार सकाळपासून महाराष्ट्रातून एकही बस बेळगावकडे आलेली नाही.
महाराष्ट्रातून सकाळी फक्त बेळगावला पाच बस आल्या होत्या त्याच्यानंतर एक पण बस आलेली नाही.बेळगाव मधून महाराष्ट्र कोल्हापूर पुणे मुंबईच्या दिशेने जाणारे बस चालक सुद्धा घाबरून निपाणी पर्यंत जातो म्हणून बस डेपो मॅनेजरला सांगत आहेत.पुढे महाराष्ट्रात काचा बसच्या फोडल्या तर आम्ही जबाबदार नाही असे बस चालक डेपो मॅनेजरला सांगत आहेत अशी माहिती मिळत आहे.