बेळगाव लाईव्ह :कर्नाटक स्टेट ब्रिज असोसिएशन आणि बेळगाव डिस्ट्रिक्ट कॉन्ट्रॅक्ट ब्रिज असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शनिवार दि. 1 आणि रविवार दि. 2 मार्च 2025 रोजी राष्ट्रीय पातळीवरील ‘सुहासचंद्र चंदगडकर स्मृति ब्रिज स्पर्धा -2025’ चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती बेळगाव डिस्ट्रिक्ट कॉन्ट्रॅक्ट ब्रिज असोसिएशनचे (बीडीसीबीए) अध्यक्ष दिलीप भागवत यांनी दिली
शहरातील टिळकवाडी क्लब येथे आज बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. भागवत यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा खानापूर रोडवरील तिसऱ्या रेल्वे गेट जवळ असलेल्या नेटिव्ह इन या हॉटेलच्या सभागृहात आयोजित केली जाणार आहे.
या स्पर्धेमध्ये स्थानिक ब्रिज खेळाडूंसह मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर, मिरज, सांगली, बेंगलोर, मंगळूर वगैरे विविध ठिकाणचे खेळाडू भाग घेणार आहेत. सलग दोन दिवस चालणाऱ्या सदर स्पर्धेसाठी सुमारे 1 लाख रुपयांची पारितोषिके पुरस्कृत करण्यात आली असून जवळपास 16 यशस्वी स्पर्धाकांना ही पारितोषिके प्रदान केली जातील.
स्पर्धेच्या आयोजनाचा उद्देश ब्रिज हा खेळ किती रोचक आहे हे सर्वांना कळावे हा आहे. कॉलेज युवकांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वजण अगदी महिला सुद्धा हा खेळ खेळू शकतात.
आम्ही आयोजित केलेल्या स्पर्धेत स्त्री -पुरुष समानतेच्या तत्त्वावर महिलांचाही सहभाग असणार आहे, असे बीडीसीबीए अध्यक्ष दिलीप भागवत यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस एन. व्ही. देशपांडे, एम. आय. हेगडे, आर. एल. बर्वे आदी उपस्थित होते.