बेळगाव लाईव्ह :खानापूर तालुक्यातील क्रांतिवीर संगोळ्ळी रायान्ना यांची कर्मभूमी असलेल्या नंदगड गावाची ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीची यात्रा तब्बल 24 वर्षानंतर येत्या बुधवार दि. 12 ते रविवार दि. 23 फेब्रुवारी 2025 या कालावधीत होणार असून सदर यात्रेची नंदगड ग्रामस्थ आणि यात्रा कमिटीकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. सदर यात्रा नंदगड पहिल्या बसथांब्या शेजारी भरणार आहे.
भव्य प्रमाणात होणाऱ्या नंदगड ग्रामदेवता श्री महालक्ष्मी यात्रेच्या पहिल्या तीन दिवशी म्हणजे 12, 13 व 14 फेब्रुवारी रोजी देवी गावभर फिरणार असून शनिवारी 15 फेब्रुवारी रोजी ती रथावर आरुढ होईल. त्यानंतर भव्य अशी जल्लोषी रथयात्रा काढण्यात येईल. यावेळी रथयात्रेच्या नियोजित मार्गावर ठरलेल्या ठिकाणी देवी वस्तीला राहील.
दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी 16 फेब्रुवारी रोजी श्री महालक्ष्मी देवी रथातून गदगेवर विराजमान होणार आहे. यात्रोत्सवानिमित्त सहाव्या दिवशी म्हणजे सोमवारी 17 फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान भरवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या दिवशी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत व गोकाकचे नेते भालचंद्र जारकीहोळी यात्रेला हजेरी लावून देवीचे दर्शन घेणार आहेत
गावातील प्रमुख मानकरी पाटील बंधूंकडून मंगळवारी 18 फेब्रुवारी रोजी देवीची ओटी भरणे व नैवेद्याचा कार्यक्रम होईल. पुढे बुधवारी व गुरुवारी म्हणजे 19 व 20 फेब्रुवारी रोजी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर शुक्रवारी 22 फेब्रुवारी रोजी आंबील गाडे काढण्यात येणार असून शेवटच्या दिवशी म्हणजे रविवारी 23 फेब्रुवारी रोजी श्री महालक्ष्मी देवी सीमेकडे प्रयाण करणार आहे.
सदर श्री महालक्ष्मी यात्रा तब्बल 24 वर्षानंतर भरत असल्यामुळे ती अतिशय मोठा प्रमाणात साजरी केली जाणार आहे. त्या अनुषंगाने आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याद्वारे जय्यत तयारी करण्यात आली असून आयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीचा भव्य देखावा हे या यात्रेचे मुख्य आकर्षण असणार आहे. यात्रेदरम्यान रहदारी सुरळीत राहावी याकरिता यात्रेसाठी येणाऱ्या परगावच्या भाविकांनी कृपया आपापली वाहने रस्त्याशेजारी पार्क न करता गावातील आपल्या नातलगाच्या अथवा परिचयाच्या घरांच्या आवारात पार्क करावीत, असे आवाहन यात्रा कमिटीतर्फे करण्यात आले आहे.
दरम्यान, खानापूर तालुक्याचे माजी आमदार अरविंद पाटील यांनी यात्रेसंदर्भात बेळगाव लाईव्हशी बोलताना सांगितले की, नंदगड येथील श्री महालक्ष्मी देवीची यात्रा येत्या 12 ते 23 फेब्रुवारी 2025 या कालावधीत होणार आहे. सदर यात्रा ही तब्बल 24 वर्षानंतर भरत असल्यामुळे नंदगड गावासह खानापूर तालुक्यातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यात्रेसाठीची आवश्यक सर्व पूर्वतयारी जवळपास पूर्ण झालेली आहे. यात्रेच्या ठिकाणी नंदगड ग्रामस्थांकडून अयोध्या येथील श्रीराम मंदिरातचा भव्य देखावा उभारण्यात येत असून त्याचे काम देखील उद्या मंगळवारी कळस वगैरे बसवून पूर्ण करण्यात येईल. अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या उभारणीमुळे हिंदुत्वाचा डंका पुन्हा एकदा जगभरात गाजला. त्यामुळे श्री महालक्ष्मी यात्रेच्या निमित्ताने त्या मंदिराचा देखावा या ठिकाणी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यात्रेच्या तयारीच्या दृष्टीने पंचायत अध्यक्ष, सदस्य, ग्रामस्थ कमिटीसह विविध सर्व कमिट्यांनी आपापले काम चोखरित्या पार पाडले आहे.
श्री महालक्ष्मी यात्रेनिमित्त सोलापूर येथून पाळणे वगैरे विविध मनोरंजनाची साधने दाखल झाली आहेत. या खेरीज यात्रा काळात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन देखील केले जाणार आहे असे सांगून यात्रा यशस्वी करण्यासाठी नियुक्त कमिट्यांची विविध कमिट्यांची माहिती पाटील यांनी दिली. तसेच यात्रेच्या निमित्ताने आहेराची देवाणघेवाण करण्याच्या प्रथेला यावेळी ग्रामस्थ व यात्रा कमिटीने फाटा देण्याचा निर्णय घेतला आहे. तेंव्हा यात्रेस येणाऱ्या पै पाहुण्यांसह भाविकांनी कोणत्याही प्रकारचा आहेर आणू नये, आमच्याकडूनही कोणता आहेर दिला जाणार नाही असे स्पष्ट करून खानापूर तालुक्यासह बेळगाव जिल्हा आणि परगावच्या भाविकांनी नंदगडच्या श्री महालक्ष्मी यात्रेला भक्तीभावाने आवर्जून हजेरी लावून देवीच्या दर्शनाचा आणि तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा आणि आम्हाला उपकृत करावे, असे जाहीर आवाहन माजी आमदार अरविंद पाटील यांनी नंदगड ग्रामस्थ आणि श्री महालक्ष्मी यात्रा कमिटीच्यावतीने केले.