बेळगाव लाईव्ह :एकीकडे ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीची यात्रेची धामधूम सुरू असताना दुसरीकडे स्वयंपाक करत असताना गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन 6 जण जखमी झाल्याची घटना नंदगड (ता. खानापूर) येथे काल गुरुवारी दुपारी घडली. जखमींपैकी एका व्यक्तीची प्रकृती चिंताजनक आहे.
खानापूर तालुक्यातील नंदगड येथे गेल्या बुधवारी 12 फेब्रुवारी पासून श्री महालक्ष्मी देवीची यात्रा सुरू आहे. मुख्य यात्रेला रविवारपासून प्रारंभ झाल्यामुळे स्नेहभोजनाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होत आहेत.
गावातील जनता कॉलनीमध्ये रघुनाथ मादार यांच्या घरात स्वयंपाक करीत असताना अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट झाला या स्फोटात घरातील रघुनाथ मादार (वय 35), नागराज कोलकार (वय 30), मनुषा कांबळे (वय 26), प्रकृती कांबळे (वय 3), आराध्या निलजीकर (वय 9) व अन्य एक जण असे जखमी झाले.
जखमींना प्रारंभी नंदगड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी तात्काळ बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
ज्यावेळेस स्फोट झाला त्यावेळी शेजाऱ्यांनी तात्काळ पाण्याचा वापर करून आग आटोक्यात आणली. सदर घटनेची नंदगड पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पुढील तपास सुरू आहे.