बेळगाव लाईव्ह ;कर्ज वसुलीसाठी त्रास देणाऱ्या फायनान्स कंपन्या व खाजगी सावकारांवर कारवाई करण्यासाठी बेळगाव पोलीस आयुक्तालयाने 9483931100 ही हेल्पलाइन सुरू केली असून तिचा कर्ज वसुलीच्या तगाद्याला कंटाळलेल्या नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग यांनी केले आहे.
खाजगी बँका, सहकारी पतसंस्था, खाजगी सावकार यांच्याकडून मायक्रो फायनान्सच्या नावाखाली राज्यातील सर्वसामान्य जनतेची लूट केली जात आहे. या संदर्भात राज्यभरातून 10 लाखाहून अधिक तक्रारी सरकारकडे गेल्या आहेत या तक्रारींची दखल घेऊन राज्य शासनाने मायक्रो फायनान्सबाबत नवा अध्यादेश जारी केला आहे. त्याचप्रमाणे गरजवंतांना पैशासाठी त्रास देणाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेशही गृह मंत्रालयाने पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे राज्यातील पोलीस खाते देखील कारवाईसाठी सजग झाले आहे.
राज्य सरकारकडे गेलेल्या 10 लाख तक्रारींमधील तब्बल 3 लाख तक्रारी एकट्या बेळगाव जिल्ह्यातील आहेत. सदर बाब बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक आणि शहर पोलीस आयुक्तांनी गांभीर्याने घेतली आहे. पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग यांनी गुरुवारी या संबंधीचे परिपत्रक सोशल मीडियावर व्हायरल केले आहे. जर कुणी वसुलीसाठी त्रास देत असेल, कुणी बळजबुरीने वसुली करत घराला टाळे ठोकणे, वस्तू जप्त करणे असे प्रकार करत असेल तर संबंधितांनी उपरोक्त 9483931100 या क्रमांकावर संपर्क साधावा. संबंधितांच्या तक्रारीची तातडीने दखल घेऊन संबंधित अखत्यारित येणाऱ्या पोलीस निरीक्षकांकडे पाठवली जाईल. पोलीस निरीक्षकाकडून त्याची शहानिशा करून तक्रारीत तथ्य आढळल्यास त्रास देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याबरोबरच पुढील कारवाई केली जाईल. तसेच ही हेल्पलाइन 24 तास सुरू राहणार असल्याचे परिपत्रकात नमूद केले आहे राज्यभरात मायक्रो फायनान्स वसुली बाबतच्या तक्रारी वाढल्यामुळे सरकारने नवा कायदा केला आहे. बळजबरीने वसुली करणाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलीस खात्यालाही दिले आहेत. त्यानुसार पुढील कारवाई होईल. त्यासाठीच 9483931100 ही हेल्पलाइन तयार करण्यात आली आहे. यावर येणाऱ्या तक्रारींची शहानिशा करून संबंधित अधिकाऱ्यांकडे चौकशीसाठी पाठवल्या जातील. त्यामुळे नाहक छळवणूक होणाऱ्या प्रत्येकाने हेल्पलाइनवर संपर्क साधण्यास हरकत नाही, असे पोलीस आयुक्त मार्बन्यांग यांनी स्पष्ट केले आहे.