बेळगाव लाईव्ह : हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक येथे म. ए. समिती युवा आघाडीतर्फे चंदगड–आजरा मतदार संघाचे नवनिर्वाचीत आमदार शिवाजी पाटील यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. या सत्कारासाठी बेळगाव व खानापूर तालुक्यातील समितीप्रेमी लोक, आजी–माजी लोकप्रतिनिधी व मराठीप्रेमी जनता उपस्थित होती. मात्र आमदार शिवाजी पाटील यांना एका महत्त्वाच्या बैठकीसाठी दिल्ली येथे जावे लागल्याने या ठिकाणी अनुपस्थित राहिले. त्यांची अनुपस्थिती सीमावासीयांना खटकली असून याचा उद्वेग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या खजिनदारांच्या भाषणाच्या माध्यमातून बाहेर पडला व हाच विषय काल झालेल्या “मध्यवर्ती” च्या बैठकीत चर्चिला गेला. तालुका युवा आघाडीचे सचिव शंकर कोनेरी यांनी हा विषय मांडला व सत्कार कार्यक्रमात “खो” घालणाऱ्या “त्या” घरभेद्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.
9 फेब्रुवारी हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाच्या आवारात झालेल्या कार्यक्रमात खजिनदारांनी एका ‘त्रिकुटा’ मुळे आमदार सत्कार सोहळ्याला अनुपस्थित राहिल्याचा गौप्यस्फोट केला होता आणि यानंतर सीमाभागात मोठ्या चर्चा रंगू लागल्या. त्या त्रिकुटा बाबत लोकांच्या मनात अनेक नावांची चर्चा रंगू लागली असताच संशयाची पाल अनेकांच्या मनात चुकचुकत होती,समितीचा होणारा कार्यक्रम विघ्नसंतोषिनी रोखण्याचा प्रयत्न केला. पण असे अनेक मानापमान पचवणारे समितीचे नेतृत्व आणि इच्छाशक्ती ही कधीच कुणी झाकोळू शकणार नाही. त्यामुळे अनेकांच्या मनात असणारे आणि अनेकांच्या मनात कोरणारे आनंदाचे कारण देखील आपोआप मावळेल यात काही शंका नाही.
कालच्या बैठकीत त्या त्रिकुटांची नावे जाहीर करण्यात आली नाहीत मात्र त्यांना भेटून समज द्या सीमा लढ्याला बाधा येईल असे कृत्य करू नका असे सांगा अशा सूचना तालुका युवा आघाडीला करण्यात आल्या.समितीवर कितीही वार केला तरी समिती जराजर्जर होत नाही’! कोणाचा कल कुठे आहे आणि कुणाचा घट कुठे भरला जात आहे, हे चांगलेच आता लोकांना कळू लागले आहे. अशा माणसाला निश्चितच समितीची जनता आपला खाक्या दाखवेल यात वाद नाही. ओठात एक अन पोटात एक अशी चावट क्रियाप्रक्रिया करणाऱ्याला निश्चितच शिक्षा मिळेल यात शंका नाही.
घडलेल्या प्रकारानंतर आता सीमाभागात मोठी चर्चा रंगू लागली असतानाच ‘त्या’ घरभेद्यांचा ‘आका’ कोण? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. शिवाय मुंबई येथे धडक मोर्चा काढून आंदोलन करण्याच्या तयारीत देखील समिती आहे. आमदारांना बेळगावला येण्यापासून कुणी रोखले? यामागचे बोलविते धनी कोण? जाहीर सत्कार सोहळ्यासाठी आधीपासूनच सर्व तयारी, निमंत्रण पत्रिका, कार्यक्रमाचे स्वरूप जाहीर झालेले असूनही आमदार बेळगावला का आले नाहीत? हि क्रिया घडवून आणणारे झारीतील शुक्राचार्य कोण? अशी क्रिया घडविण्यामागेच उद्देश तरी काय? सीमाभागाच्या प्रवाहापासून सध्या अज्ञातवासात असल्याचे ढोंग करून पुन्हा सीमाभागात दबक्या पावलांनी येऊन वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न कुठला ‘शकुनी’ तरी करीत नाही ना? असे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
शिवाय कार्यक्रमादीवशीच देखील ‘त्या’ घरभेद्यांची नावे का जाहीर केली नाहीत व मध्यवर्तीच्या कालच्या बैठकीत फक्त चर्चेचा फार्स करून विषयाला बगल देण्यात आली की काय? असाही प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. तालुका समिती व युवा आघाडीने एवढ्या उत्स्फूर्तपणे आयोजिलेला सत्कार कार्यक्रमात “खो” घालणाऱ्या त्या घरभेद्यांचा व त्यांच्या “आका” चा जनता नेहमी प्रमाणे “कार्यक्रम” करणार हे मात्र नक्की.